पुणे : ‘मला खात्री आहे, की या खेळीबद्दल सॅमला महेंद्रसिंह धोनीशी बोलायला आवडेल. मला तर सॅममध्ये धोनीचीच झलक बघायला मिळाली. धोनीही सामना अखेरपर्यंत रोमहर्षक स्थितीत घेऊन जात असे,’ अशी प्रतिक्रिया इंग्लंड क्रिकेट संघाचा बदली कर्णधार जोस बटलर याने व्यक्त केली.

भारताने तिसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यात इंग्लंडला सात धावांनी नमविले. या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ने जिंकली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३२९ धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने इंग्लंडची ७ बाद २०० अशी स्थिती केली होती. या वेळी भारताचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, सॅम करनने चिवट लढा दिल्याने भारतीय संघात चिंतेचे वातावरण निर्माण केले होते. सॅमने आदिल रशीदसह आठव्या विकेटसाठी ५७ आणि मार्क वूडसह नवव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी रचून इंग्लंडच्या विजयाच्या समीप पोहोचविले होते. इंग्लंडला विजयासाठी अखेरच्या षटकात १४ धावांची गरज असताना वूड धावबाद झाला आणि सॅमला इंग्लंडला विजय मिळवून देणे शक्य झाले नाही. सॅमने ८३ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ९५ धावा केल्या.

२२ वर्षीय सॅम आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळतो. गेल्या वर्षी चेन्नईने त्याला साडेपाच कोटी रुपयांत संघात सामावून घेतले होते. यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अष्टपैलू सॅमला काही सामन्यांत सलामीला पाठविले होते. धोनीच्याच तालमीत तयार झालेला सॅम भारताविरुद्धच्या तिसऱ्या वन-डेत सामनावीर ठरला. लढतीनंतर बटलर म्हणाला, ‘सॅमची खेळी जबरदस्त होती. आम्ही लढत गमावली असली, तरी त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. एक हाती सामना कसा जिंकून द्यावा, हे यातून नक्कीच शिकावे. तो सामन्यागणिक प्रगती करीत आहे. तो अवघा २२ वर्षांचा आहे. अनेकांना कारकिर्दीत अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना करता येत नाही.’ सॅमने भारताच्या ऋषभ पंतची विकेटही घेतली. आठव्या क्रमांकावरील वन-डेतील सर्वोच्च खेळीच्या जागतिक विक्रमाशी त्याने बरोबरी केली. २०१६मध्ये इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने श्रीलंकेविरुद्ध नाबाद ९५ धावांची खेळी केली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here