सध्याच्या घडीला सर्वच आयपीएलचे संघ तयारीला लागले आहेत. सर्व संघांचे कॅम्प सुरु असून येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्या सरावालाही सुरुवात होणार आहे. पण आता मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघातील काही खेळाडू संपूर्ण आयपीएल खेळू शकत नाही, असे दिसत आहे. कारण या संघांतील काही खेळाडूंना आयपीएलमधील काही सामना खेळता येणार नाहीत. त्यामुळे या संघांसाठी हा एक मोठा धक्काच असेल.
सध्याच्या घडीला दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट मालिका सुरु आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे नावाजलेले खेळाडू क्विंटन डीकॉक, कागिसो रबाडा, एन्रीच नॉर्तजे, लुंगी एनगिडी आणि डेव्हिड मिलर हे आयपीएलमधील काही सामने खेळू शकणार नाहीत. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २ एप्रिलपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेमध्ये हे सर्व खेळाडू खेळणार आहे. ही मालिका संपल्यावरही या खेळाडूंना थेट आयपीएलमध्ये खेळता येणार नाही. कारण ही मालिका संपल्यावर ते भारतामध्ये दाखल होतील आणि त्यानंतर त्यांना क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये या खेळाडूंची करोना चाचणीही करण्यात येणार आहे. या चाचणीमध्ये जर ते निगेटीव्ह सापडले तरच त्यांना आयपीएलमध्ये खेळता येणार आहे.
डीकॉक हा मुंबई इंडियन्सच्या संघआतील अविभाज्य भाग होता. कारण रोहित शर्माबरोबर डीकॉक हा सलामीला यायचा आणि संघाला चांगली सुरुवात करुन द्यायचा. पण यावर्षीच्या आयपीएलच्या काही सामन्यांमध्ये आपल्याला डीकॉक दिसणार नाही. त्यामुळे डीकॉकच्या जागी इशान किशन हा रोहित शर्माबरोबर सलामीला येऊ शकतो. कारण भारतीय संघाकडून खेळताना इशानने सलामीवीराची भूमिका पार पाडली आहे. दिल्लीच्या संघाला या गोष्टीचा मोठा फटका बसणार आहे. कारण दिल्लीच्या संघात वेगवान गोलंदाज हे दक्षिण आफ्रिकेचे आहेत. त्यामुळे दिल्लीच्या संघाला यावेळी सर्वाधिक फटका बसू शकतो.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times