जयंत सोनोने । अमरावती

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेला गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित उपवनसंरक्षक धारणी येथील कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. ()

नागपूरच्या रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात आलेल्या शिवकुमार बाला यास धारणी पोलिसांनी २६ मार्च रोजी अटक केली होती. दुसऱ्याच दिवशई त्याला एम. एस. गाडे यांच्या न्यायालयापुढे हजर करण्यात आल्यानंतर त्यास आधी २९ मार्चपर्यंत व नंतर ३० मार्चपर्यंत अशी सलग तीन दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. हा कालावधी संपल्यानंतर काल पुन्हा शिवकुमारला कडेकोट बंदोबस्तात न्यायालयापुढे हजर करण्यात आले.

तपास अधिकाऱ्यांकडून कोर्टापुढे वाढीव कोठडी मिळवून घेण्यासंदर्भात चार पानी पत्रासह मांडण्यात आलेल्या विषयान्वये असे स्पष्ट करण्यात आले की, मृतकाकडून हस्तगत करण्यात आलेले पत्र, संभाषणाच्या व्हाॅयरल क्लिप आणि आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मोबाईल यांचा डीसीआर तज्ज्ञाच्या मदतीने तपासण्यात येत आहे. आरोपीच्या कार्यालयाकडून सक्षम पुरावे म्हणून जप्त करण्यात आलेल्या शासकीय दस्ताऐवजांचे अवलोकन अध्याप पूर्ण झाले नसून आरोपीच्या संभाषणाचे क्लिप आणि घटनेच्या अनुषंगाने आरोपीची विचारपूस पूर्व करणे, त्याप्रमाणे आरोपी सोबत इतर आरोपीचा सहभाग होता काय? हे तपासून पाहावे लागणार आहे. गुन्ह्याच्या दृष्टीकोनातून वेळमर्यादा, स्थळ आणि संभाषणे याची पृष्टी पुराव्यांसाठी एकत्रित करणे, पुराव्यांसाठी गोळा करण्यात आलेले संभाषणे, वॉइस रेकॉर्डिंग, डीसीआर पुरावे हे एक वर्षापेक्षा अधिक जुने असल्यामुळे त्यांची शहानिशा करावी लागणार आहे. त्यासाठी आरोपीची पोलीस कोठडी ही पुढील सात दिवसांसाठी वाढवून देण्यात यावी असा युक्तिवाद तपास अधिकारी पूनम पाटील आणि सरकारी वकील रझा सिद्दिकी यांच्या वतीने मांडण्यात आला. तर आरोपीच्या वतीने अॅड. सुशील मिश्रा यांनी कोठडीत वाढ करण्यास आक्षेप घेतला. वॉईस रेकॉर्डिंगची तपासणी अथवा डीसीआर सारख्या प्रक्रियेसाठी वाढीव पीसीआरची आवश्यकता नसून गेल्या तिन दिवसांपासून दस्ताऐवज, क्लिप आणि माझे क्लाईड ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता यापुढे वाढीव पोलीस कोठडी अजिबात नको असा युक्तिवाद न्यायालयापुढे मांडण्यात आला. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून अखेर न्यायाधीश एम. एस. गाडे यांच्या कोर्टाकडून निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला यास १४ दिवसांपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश दिले.

कोर्टासमोर अतिरिक्‍त सुरक्षा

शिवकुमार बाला यास एम. एस. गाडे यांच्या कोर्टापुढे हजर करण्यात आले. त्यादरम्यान कोर्टाच्या परिसरात क्युआरटी पथकाचे जवान व विषेश पोलीस पथकाचे जवान तैनात करण्यात आले होते. २७ मार्च रोजी विनोद शिवकुमार यास कोर्टापर्यंत आणले गेले तेव्हा काही महिलांनी निदर्शने केली होती. तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून अमरावती येथून अतिरिक्‍त पोलीस कुमक मागवण्यात आली होती. त्यामुळे काही काळ कोर्टाच्या परिसरात संचारबंदी सदृश वातावरण होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here