गोरेगाव पंचायत समितीतंर्गत येणाऱ्या कुऱ्हाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शिवकुमार चैतराम रहांगडाले रा. आदर्श कॉलनी, गोरेगाव यांचा सरपंच अलका पारधी यांचे पती मार्तंड पारधी यांच्यासोबत वाद झाल्याने २४ मार्चला रात्री घरी घेऊन विषारी औषध प्राशन केले. दोनदा उलटी केल्याने त्यांना गोंदिया येथे उपचारासाठी भरती केले. शिवकुमार यांची प्रकृती गंभीर होत होती. शुक्रवारी पत्नी अंतकला यांनी पतीची बॅग बघितली असता त्यांना शिवकुमार यांनी लिहिलेले पत्र आढळले. त्यात शिवकुमार यांनी मागील एक वर्षांपासून सरपंचांचे पती मार्तंड पारधी ग्रामपंचायतच्या कामात हस्तक्षेप करीत असल्याचे लिहिले आहे. चुकीचे बिल देऊन पैसे काढण्यासाठी प्रवृत्त करीत असून तसे न केल्यास वरिष्ठांकडे खोट्या तक्रारी करून खोटी कामे करण्यासाठी दबाव आणतात. त्यांच्या त्रासाला कंटाळून मानसिक संतुलन बिघडल्याने करीत असल्याचे पत्रात नमूद आहे. प्रकृती गंभीर झाल्याने शिवकुमार यांना नागपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शिवकुमार यांनी लिहून ठेवलेल्या पत्राच्या आधारे त्यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार दिली. सरपंचाचे पती हे जिल्हा परिषदेत शिक्षक आहे.
गोरेगाव पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल करून घेतली. त्यानुसार सोमवारी मार्तंड पारधी यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाकडे पोलिस कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने पोलिस कोठडी न देता जामीन दिला. मात्र, आता प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गोरेगाव पोलिस निरिक्षक सचिन मेहतरे यांनी दिली. दरम्यान, मंगळवारी मृतदेह पोलिस ठाण्याच्या आवारात आणल्याने तणाव निर्माण झाला होता.
आरोपी शिक्षक पारधी निलंबित
ग्रामविकास अधिकारी शिवकुमार रहांगडाले यांच्या आत्महत्येप्रकरणी सरपंच महिलेला पदमुक्त करावे व त्यांच्या आरोपी पतीला निलंबित करून विभागीय चौकशी प्रस्तावित करावी, अशी मागणी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांनी निवेदनातून केली होती. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एका आदेशाद्वारे हिवरटोला येथील शिक्षक मार्तंड पारधी यांना निलंबित केले आहे. मंगळवारी याबाबत आदेश काढला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times