मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडणार आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मात्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांना या सोहळ्याचे आमंत्रण नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट सभांनी गाजलेले शिवाजी पार्क मैदान आणि अरबी समुद्र यांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवासाच्या ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे. स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा बनविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखड्यांमधून मुंबईतील वास्तुविशारद आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृष्ट ठरला. राज्य सरकारने या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती केली. वास्तू उभारणीचा पहिला टप्पा १४ महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे.

वाचा:

दादर येथील जुन्या महापौर निवासात हा भूमिपूजन सोहळा होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीची बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह भूमिपूजन समारंभ होणार असून, त्याचे ऑनलाइन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , महसूलमंत्री यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. मात्र, आमंत्रितांच्या यादीत फडणवीसांचं नाव नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातच या स्मारकाची घोषणा झाली होती. स्मारकासाठी भू वापर व पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या युती सरकारच्या काळातच मिळाल्या होत्या. फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील माहिती दिली होती. त्यानंतर आता प्रत्यक्षात काम सुरू होत असताना फडणवीसांना या कार्यक्रमापासून दूर ठेवलं गेलं आहे.

वाचा:

सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेचं बिनसल्यानंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी व काँग्रेससोबत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. त्यानंतर भाजपनं सातत्यानं शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. भाजपच्या काही नेत्यांनी ठाकरे कुटुंबीयांवरही टीका केली आहे. सचिन वाझे प्रकरणात भाजपनं विशेषत: फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले होते. त्यामुळं त्यांच्यातील दुरावा वाढल्याचं बोललं जात आहे. आजच्या कार्यक्रमाचं आमंत्रण फडणवीसांना नसण्यामागे हेही एक कारण असल्याचं बोललं जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here