पंढरपूरः भारत भालके यांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी एकूण ३८ जणांनी ४४ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील ८ उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले असून ३० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

पंढरपूर पोटनिवडणुक लढतीत दोन्ही बाजूने बंडखोरीला उधाण आले आहे. भाजपला काल याची मोठी लागण झाली असून परिचारक गटाच्या पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांनी उमेदवारी दाखल करीत भाजपला मोठा धक्का दिला आहे. काल नगराध्यक्षा भाजप उमेदवाराच्या कार्यक्रमात असताना पती नागेश भोसले बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल करत होते. नागेश भोसले यांच्या बंडखोरीमुळे पंढरपूर शहर व परिसरात भाजपाला धक्का बसू शकतो. तर भाजप उमेदवार समाधान अवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर अवताडे यांनीही घरातूनच बंडखोरी करीत भाजपाला आव्हान दिल्याने मंगळवेढ्यात भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.

असाच फटका राष्ट्रवादीलाही बसला असून त्यांच्या मित्रपक्षातून बंडखोरी झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील यांनी उमेदवारी दाखल केली असून पक्षाने सचिन पाटील याना पक्षाचा AB फॉर्म दिल्याने हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातो. भारत भालके हे पहिली निवडणूक स्वाभिमानीकडून लढून विजयी झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात मोठी ताकद असून राजू शेट्टी प्रचारासाठी तळ ठोकून थांबणार असल्याने राष्ट्रवादीला हे बंड वरिष्ठ पातळीवरून शांत करणे गरजेचे बनले आहे.

शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक शैला गोडसे यांनी उमेदवारी कायम ठेवत प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून आता शिवसेनेनं त्यांच्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. शैला गोडसे या गेल्या १० वर्षे महिला व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलने करीत आल्या असून महिलावर्गात त्या लोकप्रिय आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेत त्या सदस्य असून कार्यकर्ते व मतदारांच्या दबावामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत हि निवडणूक लढवणार असल्याची त्यांची भूमिका आहे.

सध्या भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना बंडखोरी शांत करणे हे मोठे आव्हान ठरणार असून याच्याशिवाय निर्णायक ठरू शकणाऱ्या धनगर उमेदवारांची उमेदवारीही दोन्ही पक्षांच्या अडचणीत भर घालणारी ठरणार आहे. या उमेदवारात सातारा येथील अभिजित बिचकुले यांच्यासह इंदापूर, सोलापूर, करमाळा, पुणे अशा मतदारसंघाशी संबंध नसलेल्याही अनेक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here