म. टा. प्रतिनिधी, : नागपुरात कुठलेही स्थानिक निर्बंध १ एप्रिलपासून राहणार नाही. राज्य शासनाने २७ मार्च रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार केवळ रात्रीची जमावबंदी राहणार असल्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले असल्याने नागपूरकरांना मोठा दिसाला मिळाला.
वाढते करोनाचे संकट लक्षात घेता नागपुरात पुन्हा लॉकडाऊन लागणार, अशी चर्चा सुरू झाली होती, मात्र पालकमंत्री नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी घेतलेल्या बैठकीत स्थानिक निर्बंध रद्द करण्यात आले असल्याचे सांगितले. मात्र लॉकडाऊनसंदर्भातील राज्य शासनाच्या निर्देशाचे कडकपणे पालन करण्यात येणार असल्याचे राऊत म्हणाले.

या बैठकीला मुंबईहून गृहमंत्री अनिल देशमुख, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, महापौर दयाशंकर तिवारी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नव्या स्ट्रेनचा धोका

नवीन स्ट्रेनच्या करोना विषाणूचे रुग्ण जिल्ह्यात आढळून आले असून नागरिकांनी ‘आरटीपीसीआर’ ही तपासणी प्राधान्याने करण्याची गरज आहे. ब्रिटेन, दक्षिण आफ्रिका व ब्राझिल येथील नवीन स्ट्रेनचे रुग्ण आढळल्यामुळे यासंदर्भातील उपचाराबाबत प्रोटोकॉल तयार करावा व त्यासंदर्भातील संपूर्ण माहिती जनतेला उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनातर्फे तपासण्यांची संख्या वाढविण्यासाठी अडीच हजार केंद्रे सुरू केली आहेत.

खाटांसाठी समन्वय अधिकारी

नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणे त्यासोबतच रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. खाटांच्या उपलब्धतेसंदर्भात समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून जनतेलाही खाटांच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्यात येईल. करोनाबाधित रुग्ण होमक्वारन्टाईन असताना बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या. अशा रुग्णांसाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाने संहिता तयार करावी व त्यानुसार कडक निर्बंध लागू करावे, असेही राऊत म्हणाले.

या आहेत मार्गदर्शक सूचना

-रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत ५ पेक्षा जास्त व्यक्तींना बाहेर पडता येणार नाही. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याला प्रत्येकी १ हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

-सर्व सार्वजनिक स्थळे रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत बंद राहतील.

-मास्कशिवाय फिरणाऱ्याला ५०० रुपये आणि रस्त्यावर थुंकणाऱ्याला १ हजार रुपये दंड भरावा लागेल.

-सर्व सिनेमाघर, मॉल्स, सभागृह, रेस्टॉरंट रात्रीचे बंद राहतील.

-जाहीररित्या होणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना बंदी.

-लग्नात ५० पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश नसेल.

-अंत्यसंस्काराला २० पेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित राहू नये.

-मास्क घालणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित वापरचे पालन करणे या सर्व उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी व्हावी.

-कंटेन्टमेंट झोनबाबत स्थानिक प्रशासनाने घेतलेले आदेश लागू राहतील.

-सरकारी कार्यालयातील गर्दी कमी करा. महत्त्वाच्या कामांसाठी येणाऱ्यांना ओळखपत्र देण्यात यावे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here