भुतबाधेच्या नावावर पारधी समाजातील भोळ्या लोकांची फसवणूक होत असल्याचे समजताच प्रश्नचिन्ह शाळेचे मतीन भोसले स्वत: शिवरा गावात पोहोचले. परंतु, त्यांनाही धक्काबुक्की करून तेथील बुवाने गावातून निघून जाण्यास सांगितलं. त्यानंतर मतीन यांनी ‘अंनिस’ला येथील प्रकाराबाबत माहिती दिली. त्यांनी नागरिकांचेसमुपदेशन करीत अंधश्रद्धेविषयी प्रबोधन केले. त्यानंतरही अशिक्षित पारधी समाजातील लोक मांत्रिकाचे ऐकून बाधा घालविण्यासाठी सावंगा विठोबा येथे गेले. याबाबत मतीन भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचताच मंत्रिकांनी तेथून पळ काढला.
फासे पारधी समाजात शिक्षणाचा अभाव असल्याने मंत्रिकांचे म्हणणे ऐकून हे नागरिक अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब असल्याने अंधश्रद्धा पसरविणाऱ्या मांत्रिक विरुद्ध जादूटोणा कायद्यानुसार कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत मतीन भोसले यांनी व्यक्त केले.
भुताटकी झाली असा बनाव करून ३० ते ३५ जणांना मांत्रिकाने मारहाण केल्याचा प्रकार शिवरा गावात तीन दिवसांपासून सुरू असल्याचे कळल्यानंतर अंनिस अमरावतीचे सदस्य श्रीकृष्ण धोटे गावात पोहोचले. त्यांना धक्काबुक्की केली. याची माहिती पोलिस अधीक्षक हरि बालाजी एन. यांना दिल्यानंतर पोलिसांसह अंनिस कार्यकर्ते ज्यावेळी गावात पोहोचले त्यावेळी पांगापांग झाले. मांत्रिकाची दहशत व खोलवर मनात रूजलेली भिती, यामुळे गावकरी काहीही बोलण्यास तयार नव्हते. भुताटकीच्या नावावर संधीसाधू मांत्रिकाकडून शिवरा गावात भोळ्या फासे पारधींची दिशाभूल करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times