विरोधी आघाडी आणखीन मजबूत होण्याची गरज आहे. यासाठी सर्व विरोधी दलांनी राष्ट्रीय स्तरावर एक मजबूत महाआघाडी उभारण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. यावर आपण जोर दिल्याचं स्पष्टीकरणही संजय राऊत यांनी दिलंय.
शरद पवार यांनी यूपीएचं अध्यक्षपद भूषविण्याविषयी सुचवणारे संजय राऊत महाराष्ट्र काँग्रेसच्या निशाण्यावर आले होते. यावर ‘मी केवळ विरोधी महाआघाडी मजबूत करण्याची आवश्यकता व्यक्त केली. यावेळी मी सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांची कोणत्याही पद्धतीनं निंदा केली नाही’ असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.
याअगोदर, शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’मध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा उल्लेख ‘अॅक्सिडेन्टल होम मिनिस्टर’ असा करून संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसच्या निशाण्यावर आले होते. मुंबई पोलीस वसुली रॅकेट चालवत असताना गृहमंत्री देशमुखांना याबद्दल कोणतीही कल्पना कशी नव्हती, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला होता. यावर, महाआघाडी धोक्यात येईल अशी वक्तव्य करण्यापासून सगळ्याच नेत्यांनी दूर राहायला हवं, असा सल्ला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलं होतं.
‘यूपीएमध्ये शरद पवारांच्या नावाला कोणाचा विरोध असल्याची माहिती नाही. काँग्रेस नाराज असल्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या आहेत. काँग्रेसमध्ये नाराजी वगैरे नाही. किंबहुना काँग्रेस पक्षातूनच अशा सूचना येत आहेत. यूपीए अधिक मजबूत होण्यासाठी काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची अशी भूमिका आहे. सोनिया गांधींचीही तशीच भूमिका असू शकते. सोनिया गांधींनी प्रदीर्घ काळ युपीएचं नेतृत्व केलं. पण सध्या त्यांची प्रकृती खराब असते. देशात अनेक घडामोडी घडत आहेत अशावेळी यूपीएचं नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्यानं करावं ही अनेक राज्यातील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे. आज यूपीए अत्यंत विकलांग अवस्थेत आहे. यूपीएची ताकद कमी झाली असून युपीएचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावं,’ असं वक्तव्य याआधी संजय राऊत यांनी गेल्या आठवड्यात केलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times