निवृत्तिनाथ महाराज, भागवत संप्रदायाचे आद्यपीठ, माऊलींचे सकल तीर्थ. विश्वकल्याणाच्या पसायदानातले श्री विश्वेश्वरावो, आद्यपीठ, आद्यगुरू, आदिनाथ असणारे यांची आज जयंती. माघ कृष्ण प्रतिपदेला सन १२७३ किंवा १२६८ रोजी निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म झाला, असे सांगितले जाते. ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई या भावंडांमधे निवृत्तिनाथ थोरले होते. निवृत्तिनाथ ज्ञानेश्वरांचे गुरू होते. निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका () लिहून काढली.

संत ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक

नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली. गैनीनाथ वा गहिनीनाथ हे निवृत्तिनाथांचे गुरू होते. सुमारे तीन-चारशे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना, निश्चितपणे निवृत्तिनाथांची आहे, असे म्हणता येईल. योगपर, अद्वैतपर आणि कृष्णभक्तिपर, असे अभंग त्यांनी रचले आहेत. निवृत्तिनाथांची ख्याती आणि महत्त्व केवळ कवी म्हणून नाही, तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक ‌म्हणून अधिक आहे. आपले संपूर्ण अध्यात्मधन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिले व आपण त्या यशापासूनही निवृत्त झाले, असे निवृत्तिनाथांबद्दल म्हटले जाते.

निवृत्तिनाथांबद्दल असलेला आदर ज्ञानेश्वरांनी अनेक ठिकाणी व्यक्त केलेला आढळतो. अनेक तीर्थयात्रांमध्ये निवृत्तिनाथांसोबत ज्ञानेश्वर होते. निवृत्तिदेवी, निवृत्तिसार आणि उत्तरगीताटीका, असे तीन ग्रंथही निवृत्तिनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते. मात्र, आताच्याघडीला ते उपलब्ध नाहीत. धुळे येथील श्रीसमर्थवाग्देवता मंदिरात ‘सटीक भगवद्‌गीता’ आणि ‘समाधि बोध’ अशी दोन हस्तलिखिते आहेत, ती निवृत्तिनाथ महाराजांची आहेत, असे सांगितले जाते.

निवृत्तिनाथ समजून घ्यायचे तर अनेक संतांच्या हृदयस्थ भावनांना मन–स्पर्श करायचा तो भक्तीच्या ओथंबलेपणातून. तिन्ही भावांचे शब्दपूजन सूर्याची उपमा देऊन केली जाते. सूर्य म्हणजे प्रकाशाची सहस्त्रावधी किरणे, तसेच सद्गुरू निवृत्तिनाथांचे ज्ञानस्वरूप. विश्व-आत्म-स्वरूप म्हणजे निवृत्तिनाथांचे व्यक्तिमत्त्वदर्शन. निवृत्ती हे तत्त्व आहे. गुरुतत्त्व स्वरूप असतात. संतांची भाव-एकवाक्यता अनुभूतीपूर्ण आहे.

निवृत्तिनाथांचे गुणगायन

निवृत्तिनाथांनी व्यक्त केलेले भाव नामदेवांनी शब्दबद्ध करून ठेवले आहेत. नामदेव महाराजांच्या नंतरच्या काळातले सेना महाराज निवृत्तिनाथांचे वर्णन करतात. संत चोखोबा महाराज त्यांच्या अभंग गाथेतील संतांची आरती या प्रकरणात निवृत्तिनाथांचा उल्लेख निरंतर ब्रह्म आणि आनंदाचा पूर असा करतात. एकनाथ असो की नामदेव, सेना महाराज असो की चोखोबा, जनाबाई असो की कान्होपात्रा, तुकाराम महाराज असो की निळोबाराय, सोपान असो की मुक्ताई, या सर्व संतांनी निवृत्तिनाथांचे गुणगायन केले आहे.

ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधीस्थ झाल्यानंतर मुक्ताई ‘अन्नपाणी सकळ’ त्यागूनी परलोकवासी झाल्या. यानंतर अल्पावधीतच निवृत्तिनाथांनी त्र्यंबकेश्वरी देह ठेवला. निवृत्तीनाथ महाराजांची समाधी तेथेच बांधण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here