चेन्नई : गेल्या मोसमातील पराभव, अपयशाच्या कटू आठवणी विसरुन आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) मोसमात यशाची नवी झेप घेण्यासाठी महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) उत्सुक आहे. संयुक्त अरब अमिरात येथे पार पडलेल्या गेल्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले होते. प्रथमच या संघावर साखळीतून गाशा गुंडाळण्याची आफत आली. ‘नव्या जोमाने’, ‘अपयश विसरून’ अशी विशेषणे कागदी दिलासा देतील; पण प्रत्यक्ष मैदानात सीएसकेला खरोखरच प्रभावी नियोजनासह उतरावे लागेल. १० एप्रिलला त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होईल, ज्याचा कर्णधार भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत आहे.

संघाची ताकद आहे तरी काय, पाहा…धोनीसह या संघातील सारेच अनुभवी खेळाडू ही चेन्नईची जमेची बाजू म्हटली जाते. आता तर सुरेश रैनाही परतला आहे, ज्याने गेल्या मोसमात माघार घेतली होती. धोनी, रैना यासह अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, सॅम करन, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड अशी नाव चेन्नईच्या फलंदाजीतील ताकद सांगतात. तर लुंगी एनगिडी, शार्दूल ठाकूर, सॅम करन, इम्रान ताहीर, रवींद्र जडेजा आणि दीपक चहर असे चांगले गोलंदाज धोनीच्या संघात आहेत.

चेन्नईची कमकुवत बाजू नेमकी काय आहे, पाहा…अनुभवी खेळाडूंचा भरणा चेन्नईकडे आहे खरा, पण हीच बाजू त्यांना मारकही ठरू शकते. टी-२०मध्ये आवश्यक असणारी चपळता, जोश, तत्परता यामध्ये वय झालेले क्रिकेटपटू कमी पडण्याची शक्यता अधिक असते. धोनी, रैना, रायुडू यांच्यासारख्या खेळाडूंनी निवृत्ती घेतली असून ही मंडळी स्थानिक क्रिकेटही खेळत नाहीत. अशावेळी स्पर्धांत्मक सामन्यांच्या अनुभवाचा अभाव या खेळाडूंच्या अन् संघाच्या अपयशाचे कारण ठरू शकतो. त्यात धोनी आता पूर्वीसारखा डावाचा यशस्वी समारोप करण्यात कमी पडतो आहे. त्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने आयपीएलमधून माघार घेतल्याने चेन्नईला मोठा धक्का बसला आहे. विंडीजचा अष्टपैलू ब्राव्होचेही वय वाढले असून त्याच्या दुखापती डोके वर काढतात. निष्प्रभ फलंदाजीमुळे हा संघ गेल्यावर्षी मागे पडला होता. यात सुधारणा आवश्यक आहे.

या गोष्टीदेखील महत्त्वाच्या आहेत…यंदा आयपीएल लढती त्रयस्थ ठिकाणी होणार आहेत. कोणत्याही संघाला आपल्या घरच्या खेळपट्ट्यांचा फायदा घेता येणार नाही. चेन्नई संघ आपल्या फिरकी गोलंदाजांवर अवलंबून असल्याचे बघायला मिळते; पण मुंबईत खेळताना त्यांना आपल्या वेगवान गोलंदाजांना अधिक चांगल्याप्रकारे तयार करावे लागेल; कारण वानखेडेवर वेगवान गोलंदाजांना फायदा होतो.

-चेन्नई संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फॅफ डुप्लेसिस, इम्रान ताहीर, जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एनगिडी, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, ऋतूराज गायकवाड, शार्दूल ठाकूर, सॅम करन, साईकिशोर, मोईन अली, गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, हरीनिशांत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here