ताडकळस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील असलेले सिद्धार्थ दौलतराव डहाळे (वय ४३ वर्षे) यांची ताडकळस शिवारातील गट क्रमांक ३२६ मध्ये ९२ आर शेती आहे. अल्पभूधारक असलेल्या सिध्दार्थ डहाळे यांनी खरीप हंगामात पेरणीसाठी जून महिन्यात ताडकळस येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतून ६९ हजार रुपयांचे पिक कर्ज काढले होते. या पिक कर्जावरच त्यांनी आपल्या शेतात सोयाबीन पिकाची पेरणी केली होती. परंतु नेहमीप्रमाणे निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीनचे पिक हातातुन गेले होते.
तसेच गत एक वर्षापासून कोरोना महामारीने सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. यामुळे ते नेहमीच पिक कर्ज परतफेड कशी करावी या चिंतेत असायचे. याच द्विधा मनस्थितीतून सिध्दार्थ डहाळे यांनी काल चारच्या सुमारास स्वतः च्या राहत्या घरात घरी छताच्या पंख्याला दोरीचा गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. यावेळी घरात दुसरे कोणीही नव्हते. ही घटना कळताच पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धावत घेत पंचनामा केला.
क्लिक करा आणि वाचा-
ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.कल्पना आळणे यांनी डहाळे यांचे शवविच्छेदन केले. रात्री उशिरा ताडकळस येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, भावजय असा मोठा परिवार आहे. याप्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात त्यांचे बंधू गौतम दौलतराव डहाळे यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान, सिध्दार्थ डहाळे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर होते. पोलीस दलात होमगार्ड म्हणून देखील ते काम करायचे. परंतु मागील अनेक महिन्यापासून त्यांना हे काम देखील मिळत नव्हते. तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ते वैद्यकीय अधिकाऱ्यांना शवविच्छेदन करण्यासाठी देखील मदत करीत असत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times