म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
संसर्गाची दुसरी लाट अतिशय काटेकोरपणे नियमांचे पालन करून स्वयंशिस्तीने रोखणे शक्य आहे. त्यासाठी लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांचे वर्गीकरण व त्यानंतर उपचार सुरू करण्याचा प्राधान्यक्रम ठरवणे गरजेचे आहे. इतर निर्धारित सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यासह लक्षणे असलेल्या व नसलेल्या गटातील रुग्णांचे वर्गीकरण करून त्यांनी विलगीकरण व वैद्यकीय उपचार पद्धतीचे योग्यप्रकारे पालन केले तर करोनाच्या या लाटेवर या महिन्याच्या अखेरीपर्यंत मात करणे शक्य होईल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी लोकांनी आता स्वतःहून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. वारंवार सूचना देऊनही अनेक ठिकाणी गर्दी कमी होत नाही. मुंबईमध्ये लक्षणे असलेले व लक्षणे नसलेले असे दोन्ही प्रकारचे रुग्ण आहे. या दोन्ही प्रकारच्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा व उपचार मिळायला हवेत. अनेक रुग्ण विलगीकरणामध्ये असताना योग्यप्रकारे नियमांचे पालन करत नाही. त्यामुळे त्यांचा त्रास बळावतो. कुटुंबांतील सर्वांना संसर्गाची लागण होते. प्रतिबंधक क्षेत्रांची संख्या वाढवणे. जे कडक निर्बंध लावले आहेत ते निर्बंध पाळणे गरजेचे आहे. हे केले तर करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेवर मात करणे शक्य होईल, असा विश्वास डॉ. जोशी यांनी व्यक्त केला.

मुंबईमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ही जवळपास पन्नास हजारांच्या आसपास पोहचली आहे, तर लक्षणे असलेल्या प़ॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १० हजार ८३९ इतके आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या तुलनेमध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या कमी आहे.

राज्याच्या मृत्यूदर समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी, करोना संसर्गाची साखळी मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत तोडता येणे शक्य असल्याचे सांगितले. त्यासाठी कडक निर्बंध लावायला हवेत. रुगणसेवेवर येणारा ताण वाढता आहे त्यामुळे लोकांनी स्वतःची जबाबदारी आता तरी ओळखायला हवी. गर्दीच्या जागा टाळायला हव्यात. रुग्णसंख्या वाढवण्यासाठी हातभार लावणार नाही, करोनाचा संसर्ग होऊ देणार नाही, असा निर्धार प्रत्येकाने करायला हवा याकडे त्यांनी लक्ष वेधले. लसीकरणाचा वेग लक्षात घेता संसर्गाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. संसर्गाची साखळी तुटेल तसेच हर्ड इम्युनिटीही तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे डॉ. सुपे म्हणाले.

गर्दी टाळणे
केईएम रुग्णालयामध्ये रुग्णसंख्या हळुहळू वाढत असली तरीही व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या कमी आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी, करोना संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये लक्षणांची तीव्रता अधिक नाही त्यामुळे संसर्गावर मात करून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही मोठे आहे. संसर्गाचा वेग कमी करायचा असेल तर गर्दी टाळणे, घरून काम करण्यासारख्या सुविधांचा वापर करणे आवश्यक आहे, याकडे लक्ष द्यावे लागेल, असे सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here