राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत भाजपचे मीडिया सेल प्रमुख जिंदल यांनी अनुद्गार काढले होते याबाबत भाजपने दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा रोषाला सामोरे जावे असा इशारा मुश्रीफ यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. पण पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करण्यास नकार दिला. यावर बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर भाजपच्या मीडिया सेलचा प्रमुख नविनकुमार जिंदल याने पवार यांच्या आजारपणाचा संबंध वाझे प्रकरणाशी जोडला होता. त्यामुळे भाजपने माफी मागावी अशी मागणी केली होती. यामध्ये मी काय चुकीचं बोललो होतो?’ असा सवालही मुश्रीफ यांनी केला.
यावेळी पुढे बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘चंद्रकांत पाटलांची लायकी नाही, ते अतिशय भित्रा माणूस. कोल्हापूर जिल्ह्यात एकाही विधानसभेच्या जागेवर उभे राहण्याची त्यांची लायकी नाही, त्यामुळेच कोल्हापूर जिल्हा सोडून ते पुण्याला गेले. भाजप सरकारच्या गेल्या मंत्रिमंडळात अपघातानेच त्यांना महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री व उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा असे दोन नंबरचे स्थान मिळालं. कोल्हापुरातून पळून जावं लागलेल्या माणसानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रामाणिक व सोज्वळ व्यक्तीवर बोलणे योग्य नाही.’
‘करोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. राज्यात ५५ हजार बालकं बाधित झाली आहेत. राजकारण किती करायचं? याला काही मर्यादा आहे की नाही.
देवेंद्र फडणवीस असोत की चंद्रकांत पाटील असोत, सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. सरकार अस्थिर करण्याचा कितीही प्रयत्न करू देत, कसलेही व काहीही आरोप करु देत, महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालणार आहे. अशा घटनाना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य ते उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times