अमरावती: शिकण्याची इच्छा असताना सुद्धा फक्त ५० हजारांसाठी १५ वर्षीय मुलीवर करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या आईविरोधात मुलीने थेट गाडगेनगर ठाण्यात धाव घेतली. माझी आई माझे जबरदस्तीने लग्न ठरवण्यासाठी निघाल्याची तक्रार तिने दिली. पोलिसांनीही मुलीच्या तक्रारीची दखल घेऊन आईविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला तात्काळ अटक केली. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

नियमानुसार लग्न करण्यासाठी मुलीचे वय किमान अठरा वर्षे आवश्यक आहे. मात्र, अजूनही काही ठिकाणी मुलींचे कमी वयात लग्न लावून दिले जाते. शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील मुलीचे तिची आई लग्न ठरवण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, अवघ्या पंधरा वर्षीय मुलीनेच तिच्या आईविरोधात पोलिसांत तक्रार दिली.

मुलगी नववीच्या वर्गात शिकते. तिला एक सहा वर्षांची बहीण व तेरा वर्षांचा लहान भाऊ आहे. तीन भावंडाना घेऊन या मुलीची ३८ वर्षीय आई राहते. दरम्यान, मागील एक महिन्यांपासून रहाटगाव येथे राहणारा दीपक अर्जुन सूर्यंवंशी (वय २०) हा मुलीच्या घरी येत होता. मुलीसोबत लग्न करून द्या, असे त्याने मुलीच्या आईला सांगितले. हा सर्व प्रकार मुलीच्या डोळ्यांदेखत सुरू होता. यातच मुलीची आईसुद्धा लग्न लावून देण्यासाठी तयार झाली. माझे वय कमी आहे. तसेच मला शिकायचे आहे म्हणून तिने लग्नासाठी नकार दिला. मात्र, आईने आपल्याला समजून न घेता मारहाण केली, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.

शुक्रवारी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास दीपक पुन्हा घरी आला व त्याने आईला ५० हजार रुपये देण्याचे सांगत तुमच्या मुलीसोबत लग्न लावून देण्याचा आग्रह केला. त्यामुळे आता लग्न पक्के होणार असे लक्षात येताच आपण गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. असे मुलीने पोलिसांना सांगितले. मुलीने दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून ठाणेदार आसाराम चोरमले यांना आपबिती कथन केली. हा धक्कादायक प्रकार ऐकून पोलिसही अवाक् झाले. मात्र, ठाणेदारांनी तत्काळ मुलीच्या तक्रारीवरून तिच्या आईविरुद्ध तसेच दीपक सूर्यवंशीविरुद्ध गुन्हा दाखल करून मुलीच्या आईला अटक केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here