पंढरपूर: करोनाचे संकट पुन्हा वाढल्याने मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत आणि त्यानुसार पुन्हा मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आज सायंकाळी ७ वाजल्यापासून ते ३० एप्रिलपर्यंत विठुराया पुन्हा भाविकांसाठी कुलूपबंद होणार असून देवाचे नित्योपचार मात्र नियमितपणे सुरु राहणार आहेत.

आज शेवटच्या दिवशी देवाचे दर्शन मिळावे याकरीता ऑनलाईन बुकिंग करून भाविक दर्शन रांगेत आले असून सायंकाळी सात वाजता मंदिराला कुलुपे घातली जाणार आहेत. येत्या १३ एप्रिल रोजी गुढी पाडवा देखील देवाला भाविकांविना साजरा करावा लागणार असून नवीन मराठी वर्षाची सुरवातही यंदा भाविकांना विठुरायाच्या दर्शनाविनाच करावी लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या निर्बंधानंतर मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी इतर सदस्यांशी चर्चा करून आज सायंकाळ पासून मंदिर भाविकांना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता करोनाचे संकट वेळीच कमी झाले नाही तर गेल्यावर्षी प्रमाणे हे निर्बंध अजून किती दिवस वाढणार याची चिंता भाविकांना लागली असून तोपर्यंत भक्ताला देवाचा आणि देवाला भक्तांचा विरह सहन करावा लागणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here