करोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये कोविड-१९ च्या उपचारांसाठी उपयोगात आणलेली सर्व हॉस्पिटल्स पुन्हा एकदा तयार ठेवावीत. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक गंभीर असून वेगाने वाढत आहे. त्यामुळे बाधीत रूग्णांच्या उपचारासाठी पुरेशा प्रमाणात बेड्स, औषधे व ऑक्सिजन यांचा साठा उपलब्ध ठेवावा, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी यंत्रणांना दिले.
कोविड उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार असून यातून करोना रूग्णांची संख्या वाढू नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील करोनाच्या अनुषंगाने दैनंदिन असणारी रूग्णसंख्या, सद्यस्थितीत उपचाराखाली असणारे रूग्ण, चिंताजनक रूग्ण, कोरोना उपचारांच्या ठिकाणी उपलब्ध असणारा ऑक्सिजन साठा, पुरवठा, रेमडेसीवीरची उपलब्धता व अन्य औषधांची उपलब्धता आदि सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेतला. कोविड उपचार सुरू असणाऱ्या ठिकाणी आणि परिसरात सीसीटीव्हीची यंत्रणा ठेवावी, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लस घेणे हा त्यावरचा मूळ उपाय आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जिल्हा रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये या ठिकाणी जावून नागरिकांनी लसकीकरण करून घ्यावे. ४५ वर्षावरील सर्वांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे. करोनाच्या संकटापासून स्वत: आणि स्वत:चे कुटुंब मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा मदत करण्यासाठी तयार आहेत. महानगरपालिकेच्या क्षेत्रातही आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे, त्याचाही फायदा जनतेने घ्यावा, असं पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले.
सांगली जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत २ लाखापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आता प्रति दिवस १५ हजारापर्यंत लसीकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. लसीकरणासाठी नागरिकही मोठ्या प्रमाणात सहकार्य करीत आहेत. जे कोणी लसीकरणापासून वंचित राहिले आहेत त्यांनीही पुढे येवून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times