वणीतील रामपुरा वॉर्डात डॉ.पद्माकर मत्ते यांचा दवाखाना आहे. आज दुपारी मोटरसायकलवर चार तरूण दवाखान्यात आले. यातील दोन तरुण तपासणीसाठी डॉक्टरांच्या कक्षात गेले व दोघेजण बाहेर मोटरसायकलवर बसून राहिले. आत गेलेल्या दोन तरुणांनी जवळच्या चाकूने डॉ. पद्माकर मत्ते यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्याने गोंधळलेल्या डॉ. मत्ते यांनी आरडाओरड करताच रूग्णालयातील कर्मचारी, इतर रुग्ण त्यांच्या मदतीसाठी धावून आले. या गोंधळात हल्लेखोर तरूण व मोटरसायकलवर बसून असलेले तरूण पळून गेले. यावेळी मोटरसायकल सुरू न झाल्याने तरुणांनी ती दवाखान्यासमोर टाकून पळ काढला. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे डॉ. मत्ते यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना प्रथम वणीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले
क्लिक करा आणि वाचा-
या घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हल्लेखोर युवकांचा युद्धपातळीवर शोध सुरू करून अल्पवधीत हल्लेखोर अमर हनुमान पेंदोर (२८), सुप्रिम मिलींद उमरे (२३), प्रज्योत महेश उपरे (१९), शुभम ओमप्रकाश खांडरे (२४) सर्व रा.वणी या चार आरोपींना अटक केली.
क्लिक करा आणि वाचा-
यातील मुख्य आरोपी अमर पेंदोर याचा लहान भाऊ आकाश याचा काही महिन्यांपूर्वी डॉ. मत्ते यांच्या रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परत गेल्यानंतर मृत्यू झाला होता. त्यावेळी अमर व त्याच्या नातेवाईकांनी डॉ. मत्ते यांच्या रुग्णालयात गोंधळ घालून तोडफोड करीत डॉ. मत्ते यांना मारहाण केली होती. या घटनेप्रकरणी पोलिसांनी अमर पेंदोर यास अटक केली होती. त्या प्रकरणाचा वचपा काढण्यासाठी अमर यांने आज डॉ. मत्ते यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला, अशी माहिती या प्रकरणाचे तपास करणारे वणीचे पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांनी दिली. या घटनेने वणीसह जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्र हादरून गेले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times