म. टा. प्रतिनिधी, जळगाव: महापालिका प्रशासनाकडून शहरातील बाजारपेठांमध्ये नियमभंग करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी देखील मनपा उपायुक्त संतोष वाहुळे हे अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकासोबत जोशी पेठ भागातील बागवान गल्लीत अनाधिकृत हॉकर्सवर कारवाई करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी मास्क लावण्याच्या सूचना केल्यानतंर वादाला सुरुवात झाली. संतप्त झालेल्या जमावाने मनपा उपायुक्तांच्या वाहनावर दगडफेक करीत पथकाला पळवून लावण्याची घटना आज मंगळवारी दुपारी १२ वाजता घडली.

जळगावातील मुख्य बाजारपेठत नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच व्यवसाय करणाऱ्यांकडून कोरोना संदर्भात जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केली जात आहे. मंगळवारी महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे यांचे पथक या ठिकाणी आले. अनेक फळ विक्रेत्यांनी तोंडावर मास्क न घालताच व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. मनपाचे पथक जोशी पेठेतील बागवान गल्लीत आले असतानाच काही फळ विक्रेत्यांनी मनपा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. उपायुक्तांनी फळ विक्रेत्यांना नियम पाळण्याच्या सूचना दिल्या, मात्र तरीही काही विक्रेत्यांनी मनपा उपायुक्तांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत व्यवसाय जसे आहेत तसेच सुरू राहतील, अशी भूमिका घेतली.

अन् वादाला सुरुवात

मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी व्यवसाय सुरू असताना मास्क घालावा अन्यथा माल जप्त करण्यात येईल असा इशारा उपायुक्तांनी दिला. मात्र, फळ विक्रेत्यांनी उपायुक्तांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. तसेच आम्हाला करोना होत नाही असे सांगत आम्ही मास्क घालणार नाही, अशी भूमिका फळ विक्रेत्यांनी घेतल्याचे मनपा पथकाने सांगितले. त्यावर उपायुक्तांनी महापालिकेच्या पथकातील कर्मचाऱ्यांना फळ विक्रेत्यांचा माल जप्त करण्याच्या सूचना दिल्या. त्यावर आक्रमक झालेल्या फळ विक्रेत्यांनी व इतर व्यवसायिकांनी देखील महापालिका वादाला सुरुवात केली.

उपायुक्तांच्या वाहनासह पथकावर दगडफेक

उपायुक्तांनी पथकाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर या ठिकाणी जमाव वाढत गेला. काही फळ विक्रेत्यांनी मनपा कर्मचाऱ्यांचे हुज्जत घालत, कारवाईला विरोध केला. जमाव अधिक आक्रमक होत असल्याने उपायुक्तांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात फोन लावला. मात्र या ठिकाणी कोणीही फोन न उचलल्याने व जमाव वाढत असल्याने मनपाचे पथक परत फिरण्याचा तयारीत होते. असे असताना देखील जमावातील काही विक्रेत्यांनी महापालिकेच्या पथकावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये मनपा उपायुक्तांच्या वाहनाच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत. वेळीच उपायुक्तांचे पथक या ठिकाणाहून निघाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेनतंर मनपा उपायुक्त संतोष वाहुळे तातडीने शहर पोलीस ठाण्यात आले. त्यांनी त्यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पोलिसात फिर्याद दिली. याबाबत गुन्हा दाखल करुन घेण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरु आहे.

यापूर्वीही झाला होता पथकावर हल्ला

जोशी पेठ व बागवान गल्लीत याआधीही जून महिन्यात मनपा कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली होती. तसेच उपायुक्तांना काही विक्रेत्यांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाकडून सुभाष चौक, शिवाजी रोड, बळीराम पेठ, घाणेकर चौक या भागातील अनाधिकृत हॉकर्सवर जोरदार कारवाईची मोहीम सुरू केली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here