नवी दिल्लीः नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील संसदेवरील मोर्चा आडवल्याने पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री झाली. यात काही आंदोलक जखमीही झाले. मोर्चा आडवल्याने आंदोलनातील महिलांना पोलिसांना बांगड्या दाखवल्या. मोर्चा रोखणाऱ्या पोलिसांनी बांगड्या घाला, अशी टीका आंदोलकांनी केली. जामिया नगरमधील रहिवासी आणि जामिया मिलिया इस्लामियामधील शेकडो विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते.

जामिया कोऑर्डिनेशन कमिटीच्या नेतृत्त्वात सीएए आणि एनआरसीविरोधात हा मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांमध्ये जामियाचे आजी-माजी विद्यार्थी सहभागी झाले. संसदेवर हा मोर्चा काढण्यात आला होता. जामिया विद्यापीठ प्रशासन आणि दिल्ली पोलिसांनी अनेकदा आवाहन करूनही हा मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी ओखल भागात हा मोर्चा आडवला.

जामिया ते संसदेपर्यंत मोर्चा काढण्याचे जाहीर झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी जामिया आणि जवळपासच्या सर्व परिसरांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या ठिकाणांना छावणी स्वरुप आलं होतं. संसदेवर काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी आंदोलकांनी परवानगी घेतली नव्हती. यामुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. मोर्चाला हिंसक वळण देण्याचा काहींचा प्रयत्न होता, असं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांनी मोर्चा आडवल्याने आंदोलनात सहभागी असलेले विद्यार्थी बॅरिकेड्सवर चढले. या बॅरिकेड्सवरून उतरताना काही विद्यार्थी जखमी झाले. तर खूप गर्दी असल्याने काही विद्यार्थी बेशुद्ध झाले. काही बॅरिकेड्सवरून उड्या मारल्या. काही आंदोलकांनी पोलिसांवर पाण्याचे पाउच फेकत त्यांना शिवीगाळही केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

कागज नही दिखाएंगे… हल्ला बोलचे नारे

आंदोलकांनी सरकाविरोधात नारेबाजी केली. ‘कागज नही दिखाएंगे’ आणि ‘जब नही डरे गोरों से तो क्यों डरे हम औरों’ अशी नारेबाजी करण्यात आली. या आंदोलनातील महिलांनी ‘हल्ला बोल’चे नारे दिले. आंदोलकांनी यावेळी मानवी साखळीही बनवली होती. गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही आंदोलन करतोय. पण सरकारचा एकही प्रतिनिधी आमच्याशी चर्चा करण्यासाठी आला नाही. यामुळे आता आम्हीच सरकारकडे निघालोय, असं जेबा अनहद या आंदोलनकर्तीने सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here