रायपूरः छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षलवादी हल्ल्यात २२ जवान शहीद झाले. तर १ जवान बेपत्ता आहे. या हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी सोमवारी पत्रक जारी करून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनाच आव्हान दिलं. आता नक्षलवाद्यांनी मंगळवारी आणखी एक पत्रक जारी केलंय. त्यासोबत त्यांनी एक फोटोही दिला. हा फोटो शहीद जवानांची शस्रे आणि जिवंत काडतुसं आणि इतर साहित्य लुटल्याचा आहे.

सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनमधील बेपत्ता जवान राजेश्वर सिंह मनहास आमच्या तब्यात आहे. सरकारने या जवानाच्या सुटकेसाठी मध्यस्थाची नेमणूक करावी, अशी अट नक्षलवाद्यांनी ठेवली आहे. तसंच या हल्ल्यात आमचे ४ साथीदार ठार झाले, असं नक्षलवाद्यांनी पत्रकात म्हटलं.

३ एप्रिलला २ हजार जवान जीरागुडेम गावाजवळ आले होते. त्यांना रोखण्यासाठी आम्ही हल्ला केला. यात २४ जवान ठार तर ३१ जखमी झाले. एका जवानाला आम्ही ताब्यात घेतले आहे. सरकारने आधी मध्यस्थाचं नाव घोषित करावं त्यानंतरच जवानाला सोपवलं जाईल, असं नक्षलवाद्यांनी पत्रकात म्हटलं आहे.

नक्षलवाद्यांनी दंडकारण्य स्पेशल झोनल कमेटीचा प्रवक्ता विकल्प याच्या नावाने दोन पानांचे पत्रक जारी केले आहे. या चकमकीत आपले ४ साथीदार ठार झाल्याचंही त्यांनी कबुल केलं आहे. यातील महिला नक्षली सन्नीचा मृतदेह आम्हाला नेता आला नाही, असं नक्षलवाद्यांनी पत्रकात म्हटलंय.

हल्ल्यात नक्षलवाद्यांनी जवानांची १४ शस्र लुटली. २ हजाराहून अधिक जिवंत काडतूस आणि इतर साहित्यही लुटलं आहे. या पत्रकासोबत त्यांनी जवानांच्या लुटलेल्या शस्त्रांचा फोटोही जारी करत सरकारच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here