म. टा. प्रतिनिधी, पुणे
मौजमजा करण्यासाठी आणि मैत्रिणींना फिरवण्यासाठी शहरातील विविध भागांतून स्पोर्ट्स बाइक चोरणाऱ्या दोघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणत १४ लाख रूपये किंमतीच्या २० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

संतोष विष्णू नागरे (वय २५, रा. गुरुदत्त कॉलनी भेकराईनगर, मूळ- सिंदखेड) आणि सागर शरद समगीर (रा. वीर ता. पुरंदर जिल्हा, मुळ. बुलढाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. फरासखाना पोलिस ठाण्याचे कर्मचारी शंकर कुंभार यांना माहिती मिळाली, की दुचाकी चोरटे नाना पेठेत येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळस्कर, उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, बापू खुटवड, कुंभार, मयुर भोकरे, मोहन दळवी यांच्या पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी शहरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांनी शहरातून तब्बल २० दुचाकी चोरल्याचे समोर आले आहे.

संतोष मूळचा सिंदखेडचा असून गेल्या आठ वर्षांपासून पुण्यात राहतो. तर, सागर पुरंदर तालुक्यातील वीर गावचा असून त्याची मोबाईल शॉपी आहे. एका मित्रामार्फत दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर मौजमजेसाठी दोघांनी शहरातील विविध भागातील महाविद्यालयासमोरील स्पोर्ट्स बाइक चोरण्यास सुरुवात केली. विशेषतः स्पोर्ट्स बाईकवरून महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हेरुन बनावट चावीने दुचाकीची चोरी करत होते. त्यानंतर चोरलेल्या दुचाकी वीर गावातील सागरच्या मालकीच्या गोठ्यात लपवून ठेवल्या जात होत्या. दोघांनी मिळून फरासखाना आणि कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक स्पोर्ट्स बाइक चोरली होती. विमानतळ पसिरातून सहा, हडपसरमधून चार आणि विश्रांतवाडी हद्दीतून तीन दुचाकींची चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here