रवींद्र नागोराव वरगंटीवार (५०), वैशाली रवींद्र वरगंटीवार (४३) आणि साईराम रवींद्र वरगंटीवार (१९) अशी आत्महत्या करणाऱ्या तिघांची नावे आहेत. वरगंटीवार यांच्या २४ वर्षीय मुलीने अन्य जातीतील मुलाशी पळून जाऊन लग्न केले होते. त्यामुळे कुटुंबात अस्वस्थता होता. याच अस्वस्थतेतून आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास विवेकानंदनगर भागातील विहिरीत मुलीचे आईवडील व भावाने उडी घेऊन सामूहिक आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तीनही मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
नेमकं काय घडलं?
रवींद्र वरगंटीवार यांच्या मुलीचे अन्य जातीतील मुलाशी प्रेमसंबंध होते. सदर मुलाशीच आपण लग्न करणार, असे तिने घरच्यांना सांगितले. मात्र वडिलांनी या आंतरजातीय विवाहास परवानगी दिली नाही. दरम्यान, शनिवारी वरगंटीवार यांची मुलगी घरातून पळून गेली. त्यानंतर तिने जवळच्याच मार्कंडदेव मंदिरात विवाह केला. या विवाहाबाबत माहिती मिळाल्यानंतर वरगंटीवार कुटुंब अस्वस्थ झालं. आपला विरोध असतानाही मुलीने जातीबाहेरच्या मुलाशी लग्न केल्याचा राग घरच्यांना होता. याच तणावातून घरातील तीनही सदस्यांनी आज आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times