मुंबई: मुंबईतली ऐतिहासिक गिरण्यांच्या संपात वाताहत झालेल्या गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळावी यासाठी लढा उभारणारे कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे आज मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने विस्थापित झालेल्या गिरणी कामगारांचा जीवाचा सखा हरपल्याची भावना गिरणी कामगारांमध्ये पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, ४ मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. (datta iswalkar in mumbai passed away)

उद्या सकाळी वरळी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील

दत्ता इस्वलकर हे गेल्या ३ ते ४ वर्षांपासून दुर्धर आजाराने त्रस्त होते. आज सकाळी त्यांच्या मेंदूतील रक्तस्त्राव गोठल्यानंतर त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला त्यांची प्राणज्येत मालवली.

मुंबईतील मॉडर्न मिलमध्ये दत्ता इस्वलकर यांचे वडिल जॉबर होते. १९७० साली वयाच्या २३ व्या वर्षी दत्ता इस्वलकर हे मॉडर्न मिलमध्ये नोकरीस लागले. राष्ट्र सेवा दल आणि समाजवादी चळवळीतील अनेक संस्था संघटनांशी निकटचा संबंध असलेले दत्ता इस्वलकर यांनी १९८७नंतर गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्यास प्राधान्य दिले होते. रायगड जिल्ह्यातील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे ते उपाध्यक्ष होते.

ज्येष्ठ कामगार नेते दत्ता सामंत यांनी १९८२ साली गिरणी कामगारांचा मोठा संप केल्यानंतर सुमारे अडीच लाख कामगारांचे व त्यांच्या कुटुंबियांचे भविष्य मातीमोल झाले. गिरणी कामगारांना देशोधडीला लावण्यात सर्व राजकीय पक्षसंघटनांचा कसा सहभाग होता याची जाण इस्वलकर यांना होती. स्वान मिल, मॉडर्न, रघुवंशी, कमला, मुकेश, श्रीनिवास, ब्रडबरी अशा १० मिल बंद झाल्यानंतर गिरणी कामगारांना कोणी वालीच उरला नव्हता. अशा कठीण काळात २ ऑक्टोंबर १९८९ साली दत्ता इस्वलकर व त्यांच्या सहकार्यांनी बंद संघर्ष समितीची स्थापना केली. त्या समितीचे दत्ता इस्वलकर हे निमंत्रक होते.

क्लिक करा आणि वाचा-
समितीच्या स्थापनेनंतर एका वर्षांनी गांधी जयंतीला दत्ता इस्वलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत गिरणी कामगारांच्या बेमुदत उपोषणाला बसले होते. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मध्यस्थीने उपोषण सुटले. त्यानंतर १९९१ साली विकास नियंत्रण नियमावली आली. त्याचा फायदा गिरणी मालकांना गिरण्यांच्या जमिनी विकण्यात झाला. लालबाग परळ भागात त्याकाळी ५८ गिरण्या होत्या. गिरणी बंद पडल्यामुळे गिरणी कामगार देशोधडीला लागले. त्यांच्या कुटुंबाची वाताहात झाली. हे अनुभव पाठिशी असल्यामुळे दत्ता इस्वलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत नंतर अडीच दशके नेटाचा लढा लढले.

क्लिक करा आणि वाचा-
गिरणी कामगारांच्या घरांसाठी ते शेवटपर्यंत संघर्ष करीत होते. अलिकडे त्यांच्या प्रकृतीच्या तकारी वाढल्या होत्या. ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्यांच्या तब्येतीत अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अखेर आज बुधवारी रात्री मुंबईतील जे. जे. हॉस्पीटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here