मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अगदी शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच्या आठवणी सांगितल्या. मी माँच्या कडेवर बसून शाळेत आलो होतो. समोर होत्या शेणॉयबाई…ज्यांना शेणॉयबाई माहीत आहेत, त्यांना माझी तेव्हा काय अवस्था झाली असेल याची कल्पना येईलच. त्यांनी मला ओढूनच वर्गात घेतले आणि दार बंद केले. त्यादिवशी मी पूर्णवेळ वर्गात रडत होतो आणि शाळा सुटल्यानंतर घरही रडत रडतच गाठलं. याबाबत माँने बाळासाहेबांना सांगितलं तेव्हा त्यांनी उद्धवला इतक्यात शाळेत पाठवण्याची घाई नको, असे सांगितले. त्यामुळे शाळेत एक वर्ष उशीरा माझा प्रवेश झाला… उद्धव सांगत होते.
आपल्या खोडकर स्वभावाबद्दल बोलताना उद्धव यांनी वर्गातील कॉपीबहाद्दरांचे पराक्रमही सांगितले. कॉपी करण्यास मी तेव्हा अनेक मित्रांना मदत केल्याचे उद्धव म्हणाले. त्याचा एक किस्साही उद्धव यांनी सांगितला. एकदा परीक्षेत स्वत:वर निबंध लिहायचा होता. तेव्हा वर्गातल्या एका कॉपीबहाद्दराने हद्दच केली. त्याने दुसऱ्या मुलाने लिहिलेला निबंध जशाच्या तसा कॉपी केला. कहर म्हणजे त्या मुलाचं नावंही या मुलाने स्वत:च्या निबंधाला दिलं आणि बिंग फुटलं. कॉपी पकडली गेली आणि त्याला शिक्षाही मिळाली. उद्धव यांनी सांगितलेल्या या आठवणीवर हास्यस्फोट झाला.
मधल्या सुट्टीत वडापाव खायला जायचं आणि तिथून थेट शिवाजी पार्क गाठायचं हे वारंवार व्हायचं. तेव्हा प्रचंड क्रिकेटवेड होतं. कसोटी सामना पाच दिवसांचा असतो पण आमचा सामना तेव्हा महिना महिना चालायचा. जोपर्यंत सगळे आऊट होत नाहीत तोपर्यंत हा सामना अखंड सुरू राहायचा, असा किस्सा उद्धव यांनी सांगितला. जयंत पाटील यांनीही यावेळी अनेक किस्से सांगितले. बाहेर काय चाललंय ते पाहण्यासाठी बेंच खिडकीजवळ सरकवल्याने इमानदार सरांकडून मिळालेला ‘प्रसाद’ कधीच विसरू शकत नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे हे बालमोहन विद्यामंदिरचे १९७६च्या बॅचचे तर जयंत पाटील हे १९७७च्या बॅचचे विद्यार्थी असून या दोघांचाही आज शाळेने हृद्य सत्कार केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times