परभणी: महाराष्ट्रात करोनाचा उद्रेक झाला असून, दररोज ५५- ६० हजार रुग्णांना करोनाचा संसर्ग होत आहे. अशा काळात रुग्णांना उपचारादरम्यान देण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. परभणीत रेमडिसिवीर इंजेक्शन चढ्या दराने विकणाऱ्या मेडिकल दुकानदाराला अटक करण्यात आली आहे.

राज्यात करोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसाला ५५ ते ६० हजारांच्या आसपास आहे. तर मृत्यूची संख्याही शेकडोंच्या घरात आहे. परभणीतही करोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. जिल्ह्यात काल ६८४ करोनाबाधित रुग्ण आढळलेत. तर १२ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. २४६ जण करोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. रुग्णालयातील संक्रमित कक्षात आणखी ३ हजार ७६७ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ४७२ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. या संकटकाळात काहींनी पैसा कमावण्याची संधी साधून काळाबाजार सुरू केला आहे. करोनाबाधितांना उपचारादरम्यान देण्यात येणारे रेमडिसिवीर इंजेक्शन चढ्या भावात विक्री करणाऱ्या एका औषध विक्रेत्याला आज महसूल, अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून अटक केली.

परभणीचे उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहरातील डॉक्टर लाइन व वसमत रोड परिसरात कारवाई मोहीम हाती घेतली आहे. हाके मेडिकल या औषधी दुकान मालकाला अटक केली. रेमडिसिवीर इंजेक्शन सहा हजार रुपयांत विकत असल्याची तक्रार महसूल प्रशासनाला अनेकांनी केली होती. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रेमडिसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे काही औषध विक्रेत्यांनी या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू केला आहे, अशा तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. अखेर आज संजय कुंडेटकर यांच्या पथकाने केलेल्या कारवाईने काळाबाजार थांबेल आणि गरजू रुग्णांना स्वस्त दारात रेमडिसिवीर इंजेक्शन उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here