शहर व जिल्ह्यातील व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे यांची भेट घेऊन लॉकडाऊनमुळे होत असलेल्या अडचणींची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांना भेटून उदयनराजेंनी व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
लस घ्यायला लोक तयार आहेत, पण लसीचे डोस उपलब्ध नाहीत त्याबद्दल तुमचं काय मत आहे, असं पत्रकारांनी उदयनराजेंना विचारलं असता त्यांनीच पत्रकारांना उलट प्रश्न केला. ‘प्रत्येकानं फॅमिली प्लानिंग केलं असतं तर ही परिस्थिती निर्माण झाली असती का?,’ अशी विचारणा त्यांनी केली.
‘आपल्याला समजलं पाहिजे. युरोपातील किंवा अन्य देश बघा. त्यांची लोकसंख्या बघा. त्यांच्याकडं प्रत्येक गोष्टीचं एक नियोजन असतं. फॅमिली प्लानिंग असतं,’ असं उदयनराजे म्हणाले. लसीच्या पुरवठ्यावरून वाद निर्माण करण्यात अर्थ नाही. महाराष्ट्रालाच जास्त आणि दुसऱ्याला कमी का मिळावी? प्रत्येक राज्याला लस मिळाली पाहिजे एवढं मला कळतं,’ असं उदयनराजे म्हणाले.
मी व्यापारी असतो तर दुकान बंद ठेवलंच नसतं!
‘लॉकडाऊनमुळे सातारा शहर व जिल्ह्यातील छोट्या मोठ्या व्यापारी वर्गाला होत असलेला त्रास अन्यायकारक आहे. मी व्यापारी असतो तर जग इकडचं तिकडं झालं असतं तरी मी दुकान बंद ठेवलं नसतं. दुकान बंद करून जगणार कसं? कर्ज कसं फेडणार? कामगारांचे पगार कुठून देणार? मुलाबाळांचं काय करणार?,’ असा सवाल त्यांनी केला. हा काही उपाय नाही,’ असं ते म्हणाले. शनिवार-रविवार तुम्ही बंद ठेवणार. शनिवार-रविवार विषाणू नसतो का? तसं काही संशोधन असेल तर आम्हाला दाखवा, असा चिमटाही त्यांनी काढला.
वाचा: वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times