बार्शीत तुळशीराम रोडवर असलेल्या शहा हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरमध्ये या इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याचा दावा बार्शी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा होलसेल औषध विक्रेते राजन ठक्कर यांनी केला होता. याबाबत ठक्कर यांनी स्वतःच्या कामगाराला डमी गिऱ्हाईक बनवून पाठवत सदर काळाबाजार करणाऱ्या मेडिकलचे स्टिंग ऑपरेशनही केले होते. तो स्टिंगचा व्हिडीओ त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला आणि सर्व माध्यमांना पाठवत करोनाकाळात असंवेदनशीलता दाखवणाऱ्या मेडिकल स्टोअरवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक नामदेव भालेराव आणि बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखाने यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून सदर मेडिकल सील केले आहे.
वाचा:
डॉ. विक्रांत शाह यांचे हॉस्पिटल कोविड सेंटर म्हणून प्रशासनाने जाहीर केले आहे. बुधवारी सदर मेडिकलमधून चार हजार रुपयांना रेमडीसीविर इंजेक्शन साध्या चिठ्ठीवर देण्यात आले. त्याचा व्हिडीओ सामाजिक कार्यकर्ते आणि होलसेल औषध विक्रेते राजन ठकार यांनी समाज माध्यमांत व्हायरल केला होता. त्यामुळं बार्शी शहरात रेमडीसीविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे लक्षात येताच प्रशासन खडबडून जागे झाले. पोलिसांनी मेडिकल चालक आणि त्यांचे कामगार यांना ताब्यात घेतलं तर अन्न व औषध निरीक्षक नामदेव भालेराव यांनी संपूर्ण मेडिकलची तपासणी केली. त्यात आणखी तीन इंजेक्शन्स आढळली, मात्र आता या मेडिकलला औषध खरेदी विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एवढंच नाही तर सदर मेडिकलचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे औषध निरीक्षक नामदेव भालेराव यांनी सांगितले. मात्र, अन्न व औषध प्रशासनाने कोणताही गुन्हा दाखल न केल्याने पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा जणांना सोडून देण्यात आले आहे.
वाचा:
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times