मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत लॉकडाऊनबाबत काय उपाययोजना करण्यात येतील यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकात पाटील व महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते. यादरम्यान, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यात कडक लॉकडाऊनची गरज आहे नाहीतर १५ एप्रिलनंतर स्थिती गंभीर होईल, असा इशारा दिला आहे.
सीताराम कुंटे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना करोना परिस्थीतीचा अहवाल सादर केला. १५ एप्रिल ते २१ एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू शकतो. तसंच, राज्यात रेमडेसीव्हीरचा तुटवडा आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
लॉकडाऊन आवश्यक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत राज्यातील करोनाची सध्याची स्थिती आणि आरोग्य व्यवस्था यावर प्रकाश टाकला. करोनाबाबत जे अंदाज आहेत ते पाहता १५ एप्रिल ते २१ एप्रिल यादरम्यान परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. सध्या जे नवे रुग्ण आढळत आहेत त्यात तरुणवर्गाचा सर्वाधिक समावेश आहे. करोनाचे रोजचे आकडे काळजी वाढवणारे आहेत. यंत्रणांवर ताण येत आहे. त्यातून यंत्रणांचा शक्तिपात होऊ नये यासाठी आपल्याला ठोस पावले टाकावी लागणार आहेत. काहीही करून करोनाची साखळी आपल्याला तोडावीच लागणार आहे. त्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय दिसतो आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times