म. टा. प्रतिनिधी, नगरः करोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिव्हीर व टॉक्सिलीझुमॅब या इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने ‘जालीम’ उपाय शोधला आहे. मात्र यामुळे औषध विक्रेते आणि रुग्णालयांना कागदपत्रे तयार करून जतन करून ठेवण्याचे काम करावे लागणार आहे. या उपायांमुळे गैरप्रकार थांबणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सर्व कोविड रुग्णालये आणि औषध विक्रेत्यांना हा आदेश देऊन औषधांच्या विक्रीची पद्धत ठरवून दिली आहे. रुग्णांना आता ओळखीचा पुरावा किंवा आधारकार्डशिवाय औषधे मिळणार नाहीत, तर कोविड उपचाराची मान्यता नसलेल्या डॉक्टरांना ही औषधे वापरता येणार नाहीत, हे यातून स्पष्ट होत आहे.

रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने बाजारामध्ये काही होलसेल औषधे डिलर्स, औषध विक्रेत्यांकडून या औषधांचा साठा करुन कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे येत आहेत. तसेच मान्यता प्राप्त कोविड रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांशिवाय इतर वैद्यकीय व्यावसायिक करोना रुग्णांवर या इंजेक्शनचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. वास्तविक मान्यता प्राप्त कोविड रुग्णालये व पात्र डॉक्टरांनीच या औषधांचा वापर करणे अभिप्रेत आहे. मात्र हे होत नसल्याने यासाठी पद्धत निश्चित करण्यात आली आहे.

-घाऊक औषध विक्रेत्यांनी मान्यता प्राप्त कोविड रुग्णालयांकडून रुग्णाच्या नावासह प्राप्त प्रमाणपत्रानुसार थेट रुग्णालयास औषध उपलब्ध करुन द्यावे.

-ही कागदपत्रे संबंधित औषध विक्रेत्यांनी जतन करुन ठेवावीत. तपासणीच्यावेळी तातडीने उपलब्ध करुन द्यावीत.

-ज्या करोना पॉझिटीव्ह रुग्णासाठी हे औषध वापरण्यात येणार आहे त्या रुग्णाचे आधारकार्ड अथवा फोटो असलेला ओळखीचा पुरावा उपलब्ध करुन देणे बंधनकारक राहील. ही कागदपत्रेही औषध विक्रेत्यांनी जतन करून ठेवायची आहेत.

-दुकानामध्ये प्राप्त प्रमाणपत्रानुसार इंजेक्शनची झालेली मागणी व उपलब्ध करुन दिलेले इंजेक्शन याची तपशीलवार माहिती ठेवावी.

-वितरित करण्यात आलेल्या प्रत्येक रेमडेसिव्हीरच्या बॉटलवर मार्कर पेनने रुग्णाचे नाव टाकण्यात यावे. त्याची रजिस्टरमध्ये व प्रिस्क्रिप्शनवर तपशीलवार नोंद करावी. त्याखाली विक्री, वितरणाचा दिनांक व वितरकाचा सही शिक्का मारावा.

-कोविड रुग्णालयांनी रेमडेसिव्हीरचा वापर संबंधित रुग्णांवर झाल्यानंतर रिकाम्या व्हायल्स ऑडीट होईपर्यंत जतन करून ठेवाव्यात. रुग्णाचा डिस्चार्ज झालेनंतर जैववैद्यक कचरा विल्हेवाटीच्या नियमापमाणे त्यांची विल्हेवाट लावावी.

-नियुक्त भरारी पथकामार्फत रेमडेसिव्हीरचा आंतररुग्णावर झालेल्या वापराची दर दिवशी तपासणी करावी.

-परवानगी नसताना उपचार करणा-या वैद्यकिय व्यवसायिकांना ही औषधे उपलब्ध करुन देऊ नयेत. अशा वैद्यकीय व्यवसायिकांकडील रुग्णाला गंभीर लक्षणे आढळून आल्यास त्याची माहिती त्यांनी स्थानिक प्रशासनास उपलब्ध करुन द्यावी. तसेच या रुग्णाला जवळच्या सरकारी रुग्णालयात पाठवावे.

-सर्व घाऊक औषध विक्रेत्यांनी या इंजेक्शनचा दैनंदिन प्राप्त झालेला व विक्री झालेला साठा यांची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कळवावी.

– या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here