खामगाव शहरातील मध्यवस्तीत आठवडी बाजार आहे. काही व्यावसायिकांनी येथेच सुका आणि ओला भाजीपाल्याची साठवणूक करण्यासाठी गोदामे उभारली आहेत. यातील एका दुकानाला रात्री आठ वाजताच्या दरम्यान आग लागली. त्यानंतर एकापाठोपाठ १०-१२ दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखुन अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून.रात्री साडे आठवाजेपर्यंत अग्नीशमन विभागाने पाण्याचे तीन बंब रिचविले होते. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत घटनास्थळी आग विझविणे सुरू होते. रात्री उशीरापर्यंत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
आगीचे भीषणतेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. गोदामांना लागलेल्या आगीने क्षर्णाधात रौद्ररूप धारण केले. आगीचे लोट दूरपर्यंत पसरले होते. आगीच्या ज्वाळासोबतच प्रचंड धूराचे लोटही परिसरात पसरले होते. त्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, नुकसानीचा आकडा हा एक कोटी रुपयांच्या वर असल्याची माहिती असून सध्या अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलिस मोठ्या प्रमाणात घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर, बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. सर्व व्यापाऱ्याच्या दुकानांमध्ये साहित्य जळून खाक झालं आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. आगीत आठवडी बाजारातील १२ गोदाम जळून खाक झालीत. यामध्ये संतोष राजाराम क्षीरसागर, विनोद दशरथ क्षीरसागर, गजानन शंकरराव डाहे, बोदडे टेडर्स, सागर मीरची भांडार, राखोंडे टेडर्स, सादीक बागवान ट्रेडर्स, बळीराम निमकर्डे, नशीब फ्रुट, गोलू ट्रेडर्स, शोहरत खान यांच्या दुकानासह मोतीराम बाबा ट्रेडर्सचा समावेश आहे.
लातूरमध्येही कपड दुकानाला आग
लातूर येथील लाहोटी कॅम्पसमधील कापड दुकानाला रात्री ८. ३० वाजता आग लागल्याची घटना आहे. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. यात कोणताही जीवितहानी झाली नसली तरी मोठी आर्थिक हानी झाली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times