म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

गेले दोन दिवस मुंबईतील सगळ्याच लसीकरण केंद्रांवर लशींचा तुटवडा निर्माण झाल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. केंद्राकडून लशींचा साठा कमी संख्येने आल्याने मुंबईतील लसीकरणाचा वेग कमी झाला. पण शुक्रवारी लशींचा साठा उपलब्ध होताच शनिवारी सरकारी, पालिका केंद्रावर लस मिळण्यास सुरुवात झाली. या केंद्रांवर संमिश्र प्रतिसादाचा अनुभव येत गेला. असल्याने शनिवारी लस मिळणार नाही, असे वाटून काही केंद्रांकडे मुंबईकरांनी पाठ फिरवली. तर, काही ठिकाणी मुंबईकरांनी लशीसाठी आग्रह धरल्याने वादाचेही प्रसंग उद्भवले. त्यातून दिवसभरात २१ हजार मुंबईकरांनीच लस घेतली. हे प्रमाण मुंबईतील दैनंदिन लसीकरणाच्या निम्मेच ठरले.

मुंबईत करोनाचा कहर वाढत चालल्याने सरकारी, पालिका, खासगी लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढत आहे. दोन दिवस लसीकरण खोळंबल्यानंतर, मुंबईकरांसाठी शनिवारी लसीकरण पुन्हा सुरू झाले. मात्र शनिवार, रविवारी लॉकडाउन जाहीर झाल्याने मुंबईकरांची अडचण झाली. लशींचा साठा कमी असल्याने पालिकेने शनिवार, रविवारच्या दोन्ही दिवशी बंद ठेवण्याचे जाहीर केले. मुंबईत पालिकेची आणि सरकारी अशी ४९ आणि ७१ थासगी अशी एकूण १२० लसीकरण केंद्रे आहेत. शुक्रवारी रात्री पालिकेस ९९ हजार लशींचा साठा मिळाल्याने पालिकेच्या आणि सरकारी केंद्रांवर शनिवारी लसीकरण सुरू झाल्याने काही मुंबईकरांना लस घेता आली.

मुंबईत दररोज साधारण ५० हजार व्यक्तींना लस दिली जाते, मात्र शनिवारी, दिवसभरात २१ हजार ५४ मुंबईकरांनी लस घेतली.

शनिवारी, लसीकरण दुपारी १२ वाजल्यानंतर सुरू झाले. मात्र त्याविषयी अनेकांना माहिती नसल्याने सकाळपासूनच केंद्रांवर लस घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. त्यात, पालिकेने नोंदणीशिवाय लस न देण्याचे जाहीर केले होते. दुसऱ्या डोससाठी प्राधान्य दिले असले, तरीही पहिल्या डोससाठी उत्सुक असलेल्यांची संख्या मोठी होती. यातून नवीन नियम ठाऊक नसल्याने लस घेण्यासाठी आलेले मुंबईकरांचे केंद्रातील अधिकारी, डॉक्टरांशी वाद झाल्याचेही प्रकार घडले.

काही ठिकाणी अल्प प्रतिसाद

राज्य सरकारने लॉकडाउन जाहीर केल्याने शनिवार, रविवारी लसीकरण होणार नाही, असेही अनेकांना वाटले. म्हणूनच काही केंद्रावर कमी गर्दी होती. नायर रुग्णालयात १,२०० हून जास्त लशींचा साठा असताना लस घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या २५० पर्यंत होती. असा अनुभव इतर काही केंद्रांवरही आला.

माहीमसह अन्य केंद्रांवर गर्दी

माहीम मॅटर्निटी होममध्ये पहिला डोस घेण्यासाठी रांगेत उभे राहणाऱ्यांकडून वाद घातला जात होता. तसाच प्रकार भायखळ्यातील रिचर्डसन अँड क्रूडास येथेही उद्भवला. राजावाडी रुग्णालयासह इतर काही केंद्रांवरही लसीकरणासाठी गर्दी झाली होती.

सोमवारी खासगी केंद्रे सुरू

पालिकेकडे लशींचा साठा उपलब्ध झाल्याने सोमवारी काही खासगी केंद्रांमध्येही लसीकरण होणार आहे. ज्या केंद्रांनी लशींची रक्कम दिली आहे, त्यांना रविवारी साठा मिळणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचा फायदा सोमवारी मुंबईकरांना अधिक लस घेण्यास फायदा होणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here