महापालिकेने आखलेल्या फेरीवाला धोरणानुसार दादर, माहिम आणि जी/उत्तर विभागामध्ये १४ रस्ते फेरीवाला क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. या १४ रस्त्यांवर एकूण १ हजार ४८५ फेरीवाले बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी या सर्व रस्त्यांवर फेरीवाल्यांसाठी एक बाय एकच्या आकाराच्या जागा रंगवण्याचं काम सुरू झालं आहे. पालिकेने फेरीवाल्यांसाठी निवडलेल्या रस्त्यांमध्ये राजगड असलेल्या पद्माबाई ठक्कर रोडचीही निवड केली आहे. या रोडवरील कासारवाडी ते कोहिनूर स्केवेअर फुटपाथवर एकूण १०० फेरीवाले बसविले जाणार आहेत. त्यामुळे राजगड परिसर हा फेरीवाल्यांनी गजबजून जाणार आहे. महापालिकेत मनसेचा पूर्वी सारखा आवाज राहिलेला नाही. त्यामुळे मनसेला फेरीवाल्याच्या मुद्द्यावरून प्रशासनाला धारेवर धरताही येणार नसल्याचं चित्रं आहे.
महापालिकेने जी/उत्तर विभागातील गोखले रोडवर १००, भवानी शंकर रोडवर ७५, बाबुराव परुळेकर रोडवर ५०, व्ही.एस. मटकर रोडवर ३०, सेनापती बापट मार्गावर २००, एल.जे. रोडवर ३००,एनसी केळकर रोडवर १००, पद्माबाई ठक्कर रोडवर १००, शीतलादेवी रोडवर १५०, धारावी ६० फूट रोडवर ८०, माहिमच्या एमएमसी रोडवर ५०, भागोजी किर रोडवर ५०, माहीम सुनावाला अग्यारी रोडवर १०० आणि पंडित सातवडेकर रोडवर १०० फेरीवाले बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times