चेन्नई : डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून यावेळी काही चुका झाल्या आणि त्यांना त्या चांगल्याच महागात पडल्या. कारण या चुकांमुळेत हैदराबादच्या संघाला कोलकाता नाइट रायडर्सकडून पहिल्याच सामन्यात १० धावांनी पराभव पत्करावा लागला.

कोलकाताच्या संघाने यावेळी १८८ धावांचे आव्हान हैदराबादपुढे ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग हैदराबादचा करता आला असता. पण त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला पहिल्याच षटकात फक्त एका धावेवर असताना जीवदान मिळाले होते. पण याचा फायदा वॉर्नरला उठवता आला नाही. कोलकाताचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णनने वॉर्वरला बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला. वॉर्नरला यावेळी तीन धावांवर समाधान मानावे लागले. हैदराबादसाठी हा एक मोठा धक्का होता.

हैदराबादच्या संघाकडून गेल्या आयपीएलमध्ये वृद्धिमान साहाने धडाकेबाज फलंदाजी केली होती. या हंगामातही साहाकडून मोठी अपेक्षा आहे. पण या सामन्यात मात्र साहाला चांगली फलंदाजी करता आली नाही. साहाला यावेळी फक्त सात धावांवर समाधान मानावे लागले आणि हैदराबादचे दोन्ही सलामीवीर फक्त १० धावांमध्येच तंबूत परतले.

जॉनी बेअरस्टो आणि मनीष पांडे यांनी हैदराबादकडून अर्धशतके झळकावली खरी, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. खासकरून मनीष हा अखेरपर्यंत खेळपट्टीवर होता, त्याचबरोबर अर्धशतक झळकावत तो स्थिरस्थावर झालेला होता. त्यामुळे मनीषकडून संघाला यावेळी मोठ्या अपेक्षा होत्या. पण जॉनी बाद झाल्यावर त्याची फलंदाजी थोडी संथ झाली आणि तिथेच हैदराबादच्या हातून सामना निसटला.

हैदराबादचा संघ हा गोलंदाजीसाठी ओळखला जातो. हैदराबादच्या संघाला आतापर्यंत भुवनेश्वर कुमार आणि संदीप शर्मा यांनी चांगली सुरुवात करुन दिलेली होती. पण या सामन्यात मात्र हे दोन्ही गोलंदाज चांगलेच महागडे ठरले. त्याचबरोबर त्यांच्या गोलंदाजीचा चांगला वापर यावेळी वॉर्नरला करता आला नाही. भुवनेश्वरने यावेळी ४ षटकांमध्ये ४५ धावा, तर संदीपने ३ षटकांमध्ये ३५ धावा दिल्या. या गोष्टीचा मोठा फटका हैदराबादच्या संघाला बसला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here