चेन्नई : नितीष राणाने धडाकेबाज फलंदाजी करत यावेळी चाहत्यांची मनं जिंकली. राणाने यावेळी सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. राणाच्या अर्धशतकाच्या जोरावर यावेळी कोलकाता नाइट रायडर्सला हैदराबादपुढे १८८ धावांचे आव्हान ठेवता आले. राणाने यावेळी ५६ चेंडूंत ९ चौकार आणि चार षटकारांसह ८० धावांची दमदार खेळी साकारली.

हैदराबादने यावेळी नाणेफेक जिंकत कोलकाताला पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. सलामीवीर शुभमन गिलने यावेळी चौकार लगावत कोलकाताला चांगली सुरुवात करून दिली. पण गिलपेक्षा राणा यावेळी जास्त आक्रमक फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. गिलला यावेळी मोठी फटकेबाजी करता आली नाही. हैदराबादच्या रशिद खानने यावेळी गिलला त्रिफळाचीत केले आणि संघाला पहिले यश मिळवून दिले. गिलला यावेळी १५ धावांवरच समाधान मानावे लागले.

गिल बाद झाल्यावर कोलकाताला धक्का बसला असला तरी राणाने यावेळी धडाकेबाज फलंदाजी करणे सोडले नाही. राणाने यावेळी हैदराबादच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. राणाने यावेळी उत्तुंग षटकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. राणाला पंचांनी या सामन्यात पायचीत बाद दिले होते. पण त्यानंतर लगेचच राणाने डीआरएसचा वापर केला आणि त्यामध्ये तो नाबाद असल्याचे पाहायला मिळाले.

राणा यावेळी हैदराबादच्या गोलंदाजीवर तुटून पडत होता. राणाला यावेळी राहुल त्रिपाठीची चांगली साथ मिळाली. कारण दुसऱ्या टोकाकडून त्रिपाठीही मोठी फटकेबाजी करत होता. राणा आणि त्रिपाठी यांनी यावेळी दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी रचली आणि त्यामुळेच कोलकाताला यावेळी हैदराबादपुढे मोठे आव्हान ठेवता आले.

राहुल त्रिपाठीने यावेळी फक्त २८ चेंडूंत आपले अर्धशतक साकारले. हे त्रिपाठीचे आयपीएलमधील सहावे अर्धशतक ठरले. पण अर्धशतक झळकावल्यावर त्रिपाठी जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही, कारण टी. नटराजनच्या गोलंदाजीवर त्याचा सुंदर झेल हैदराबादचा यश्टीरक्षक वृद्धिमान साहाने पकडला. त्रिपाठीने यावेळी २९ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली. त्रिपाठी बाद झाल्यावर आंद्रे रसेल फलंदाजीला आला, पण रसेलला रशिद खानने बाद करत केकेआरला तिसरा धक्का दिला. रसेलला यावेळी पाच धावांवर समाधान मानावे लागले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here