राज्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना पुन्हा एकदा महाराष्ट्रावर लॉकडाऊनची टांगती तलवार असल्याचं चित्र आहे. राज्यात लॉकडाऊनच्या दिशेनं पावलंही उचलली जात आहेत. मात्र, भाजपकडून पुन्हा एकदा लॉकडाऊनला विरोध होत असल्याचं बोललं जात आहे. यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी राज्यातील करोना स्थिती व लॉकडाऊनसंदर्भात भाष्य केलं आहे.
भाजप नेते लॉकडाऊनमधील वेगवेगळ्या पॅकेजबाबत बोलत असून त्यांच्या या वक्तव्याचा नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे. ‘महाराष्ट्रात अर्थव्यवस्था एकदम ठप्प झाली पाहिजे ही परिस्थिती न करता काय सुरु ठेवता येईल किंवा कुणाकुणाला काय मदत करता येईल याबाबत आजपर्यंत चर्चा होऊन निर्णय होईल. परंतु जे काही भाजपचे लोक पैसे द्या सांगत आहेत ते योग्य नाही, असेही नवाब मलिक म्हणाले. तसंच, राज्यातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी जे गरजेचे आहे ते निश्चितपणे सरकार करेल,’ असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.
‘पॅकेज जाहीर करून कर्जबाजारी व्हा, कर्ज घ्या असे पंतप्रधान मोदीजी जाहीर करतात पण या राज्यात लॉकडाऊनच्या काळात बांधकाम मजुरांना केंद्राप्रमाणे पैसे देण्यात आले. प्रत्येक जिल्हयात जो गरीब मजुर वर्ग आहे त्यांना दोन वेळचे जेवण देण्यासाठी सरकारने चार महिने सगळी व्यवस्था केली होती. आताही गरज वाटेल तेव्हा सरकार निश्चितरुपाने व्यवस्था करेल,’ असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
‘लॉकडाऊनमध्ये राज्यात ज्यापध्दतीने कामे सुरु आहेत त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः कौतुक करत आहेत. शिवाय केंद्रीयमंत्री महेंद्र पांडे मुंबईत आले असता त्यांनीही कौतुक केले आहे. पण, उत्तरप्रदेशमध्ये रामभरोसे कारभार सुरू आहे. चाचण्या तर होतच नाही. आरटीपीसीआर करत नाही. अॅटीजन चाचण्या ८० टक्के अक्युरसी नाहीत. युपी सरकारने योग्यप्रकारे टेस्टींग केल्या तर वेगळी परिस्थिती होवू शकते,’ असा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे.
गुजरात मॉडेलची काय परिस्थिती
‘देवेंद्र फडणवीस जी परिस्थिती आम्हाला शिकवत आहेत त्यांनी गुजरातमध्ये हॉस्पिटलशिवाय लोकं मरत आहेत. गुजरात मॉडेलची काय परिस्थिती आहे हे बघितले पाहिजे,’ असा सल्लाही मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times