म. टा. प्रतिनिधी, नगर: लॉकडाउनप्रमाणेच आता कंटेन्मेंट झोनलाही नागरिक विरोध करू लागल्याचे दिसून येते. नगरमध्ये आगरकर माळा भागातील कंटेन्मेंट झोनच्या विरोधात नागरिक रस्त्यावर आले आहेत. अर्धे रुग्ण बरे होऊन परतल्यावर परिसर सील केला आहे. थोडक्या रुग्णांसाठी मोठ्या संख्येने नागरिकांचे हाल सुरू झाल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केल्या.

महापालिकेने या भागात कंटेन्मेंट झोनचा आदेश दिला. रात्री कर्मचाऱ्यांनी हा भाग सील केला. नागरिकांच्या हे लक्षात आले. शिवाय आदेशात दाखविलेल्या नकाशापेक्षा जास्त भाग सील केल्याची नागरिकांची तक्रार आहे. जागरुक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांच्या पुढाकारातून नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांकडे आपली कैफियत मांडली.

नागरिकांचे म्हणणे आहे की, या भागात अगदी विस्कळीत स्वरूपामध्ये दहा ते पंधरा रुग्ण आढळून आले. त्यापैकी निम्मे आता उपचार घेऊन घरी परतले आहेत. त्यानंतर प्रशासनाने दोन हजार लोकवस्ती असलेला भाग सील केला. तो सील करताना आतील लोकांच्या आणि परिसरातील अन्य नागरिकांचाही विचार केला नाही. शिवाय सील करताना काही राजकीय कार्यकर्त्यांचा भाग, दुकाने वगैर सोयीस्कररित्या वगळ्यात आल्याचा आरोपही नागरिकांनी केला.

नियमानुसार महापालिकेचे लोक तेथे सेवा देण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, प्रचंड भाव वाढ झाली असून मोठ्या लोकसंख्येला सेवा देण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. या भागात काही शेतकरीही आहेत. त्यांची जनावरेही आत अडकली आहेत. त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अडकुन पडले आहेत. त्यांना कामावर जायचे असेल तर बाहेरच राहण्याची सोय करण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे या भागाचे पुन्हा सर्वेक्षण करून खरोखर किती भाग सील करण्याची अवश्यकता आहे, याचा विचार करून बाकीचा मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली. यासंबंधी वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांकडेही तक्रार करणार असल्याचे मुळे यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here