म. टा. प्रतिनिधी, : रान डुकरे व हरणांच्या शिकारीच्या उद्देशाने जंगलात फिरत असलेल्या शिकारींच्या टोळक्याने थेट गस्त करीत आलेल्या चार वनरक्षकांच्या दिशेने केला. सुदैवाने यात वनरक्षक बचावले आहेत. रविवारी दुपारी ३.४० वाजता यावल अभयारण्यातील मंडप नाला भागात ही घटना घडली. दरम्यान हल्ल्यानतंर शिकाऱ्यांच्या टोळीनेही पळ काढल्याने शिकारीचा डाव उधळला गेला.

वनरक्षक विजय गोरख शिरसाठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरसाठ यांच्यासह के. बी. पवार, एल. एस. पावरा व ए. एम. तडवी असे चौघे जण मंडप नाला परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना काही अंतरावर जंगलात शिकारींची टोळी दिसली. टोळीच्या हालचाली संशयास्पद असल्यामुळे शिरसाठ यांच्यासह वनरक्षकांनी झुडुपांचा आसरा घेत टोळीचा पाठलाग सुरू केला. टोळीतील काही शिकाऱ्यांना मागे कोणीतरी पाठलाग करीत असल्याचा संशय आला. यानंतर त्यातील दोन-तीन जणांनी मागे येऊन पाहणी सुरू केली. त्यापैकी एका शिकारीच्या हातात पिस्तूल होते. आपला पाठलाग होत असल्याचे कळताच त्या शिकाऱ्याने वनरक्षकांच्या दिशेने दोन गाळ्या झाडल्या. सुदैवाने या हल्ल्यात चारही वनरक्षक बालंबाल बचावले. हल्ल्यानंतर शिकाऱ्यांनी जंगलातून पळ काढला. यानंतर वनरक्षकांनी सायंकाळी पुन्हा गस्त करुन या परिसरात पाहणी केली. या भागात शिकार झाली नसल्याचे आढळून आले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांकडून पाहणी

या जंगलास लागून मध्य प्रदेशची सीमा आहे. त्यामुळे अनेक शिकारी रानडुक्कर व हरणांच्या शिकारीसाठी या भागात येत असतात. शिकाऱ्यांकडे पिस्तुल, धारदार शस्त्र असल्यामुळे त्यांचा सामना करणे वनरक्षकांना देखील कठीण जाते. वनरक्षकांनी सोमवारी या घटनेची वरीष्ठांना दिली. त्यानंतर वनविभागाने पोलिसांनी मदत घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर पाटील यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. शिकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मंडप नाला, करंजपाणी यासह यावल अभयारण्यात गस्त वाढवण्यात आली आहे.

स्वसंरक्षणासाठी वन कर्मचाऱ्यांना हवे शस्त्र

वन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची गंभीरपणे दखल घेऊन संबंधित आरोपींना पोलिसांना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल केला पाहिजे. या भागात राज्य राखीव दलाची तुकडी कायमस्वरूपी देणे गरजेचे आहे; त्याचप्रमाणे वन कर्मचारी संख्या वाढवणे, अतिरिक्त रेंज ऑफिसची निर्मिती, गस्ती पथकाला सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक वाहने, साहित्य, शस्त्र पुरवठा गरजेचा आहे, अशी मागणी मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक यांनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here