राज्यात अनेक ठिकाणी करोनाची गंभीर स्थिती निर्माण झाली असून राज्य सरकार गेल्या काही दिवसांपासून परिस्थितीचा आढावा घेण्याचा, तसेच तज्ज्ञांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत विरोधी पक्ष मात्र सरकारला धारेवर धरत लॉकडाउनला जोरदार विरोध करत आहे. यात राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असे चित्र निर्माण झाले आहे. यावरून राज्यात लॉकडाउन लावणे योग्य की अयोग्य या संदर्भात जनतेच्या मनातही गोंधळाची स्थिती आहे. याच परिस्थितीवर अभिनेते नाना पाटेकर यांनी भाष्य केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
नाना पाटेकर पुण्यात रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात करोनाचा संसर्ग वाढत असून प्रत्येकाने या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असे नाना पाटेकर यांनी म्हटले आहे. माझ्यासह सर्वांनीच करोनाबाबतच्या नियमांचे पालन केले पाहिजे, असे सांगत लॉकडाउन करण्यात कोणत्याही सरकारला आनंद वाटत असेल का? मी कोणत्याही पक्षाचा नाही. पण जर आपल्याला मृत्यू टाळायचे असतील, तर हे गरजेचं आहे, असे मत नाना पाटेकर यांनी मांडले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
यावेळी सरकारने लॉकडाउन लावण्यापूर्वी काही जबाबदारी घ्यायला पाहिजे का?, असा प्रश्न नाना पाटेकर यांना विचारण्यात आला. त्यावर अभिनेते नाना पाटेकर म्हणाले की, सरकार कुठपर्यंत मदत करणार? सरकारला काही मर्यादा आहेत. सरकार आपल्या परीने मदत करत राहणार आहे. पण आपण मी, तू सर्वांनी काहीतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
क्लिक करा आणि वाचा-
एकाने १०० लोकांची नाही, तर एखाद दोन लोकांची जबाबदारी घेण्यासाठी या कठीण काळात पुढे येणे गरजेचे आहे. आपण स्वतःला नशीबवान समजले पाहिजे की, अशा कठीण काळात कोणासाठी तरी काही करू शकतो यासाठी आपण स्वत:ला नशीबवान समजायला पाहिजे, असेही पाटेकर पुढे म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times