राज्यात संपूर्ण लॉकडाउनची तयारी जवळपास झाली आहे. लॉकडाउन नेमका कसा असेल? त्यात नेमके काय निर्बंध असतील? काय सवलती असतील? याबाबत मुख्यमंत्री ठाकरे आज किंवा उद्या घोषणा करतील, असं वडेट्टीवार म्हणाले. ‘राज्यात एक आठवड्याचा लॉकडाउन पुरेसा नाही. किमान १४ दिवसांचा असावं असं सगळ्याचं मत आहे. अर्थात, अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. तो दोन आठवड्यांचा असावा किंवा कमी असावा किंवा जास्त असावा यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील,’ असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. ‘तत्पूर्वी, कामगारांना किंवा घरापासून दूर असलेल्यांना सुरक्षित घरी पोहोचण्यासाठी वेळ दिला जाईल. लोकांना त्यांच्या त्यांच्या गावी जाऊ देण्याबाबतही सरकार सकारात्मक आहे,’ असं ते म्हणाले.
लॉकडाउनला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या भूमिकेचा वडेट्टीवार यांनी समाचार घेतला. ‘व्यापाऱ्यांनी लोकांच्या जिवाशी खेळू नये. पंतप्रधान मोदी यांनी वर्षभरापूर्वी अचानक लॉकडाउन लावला. अजिबात सवड दिली नाही. त्यावेळी त्यांनी गपगुमान तो निर्णय मान्य केला. त्यावेळी ती गरज होती, तशी आजही आहे. त्यामुळं संकटाच्या या काळात राज्यातील व्यापाऱ्यांनी किंवा कोणीही राजकारण करू नये. घोषणा केल्यानंतरही व्यापाऱ्यांनी साथ नाही दिली तर त्यासाठी तेच जबाबदार असतील, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला. ‘करोनाचा सध्याचा स्ट्रेन अतिशय घातक आहे. त्याचा संसर्गाचा वेग भयानक आहे. बाधित रुग्ण तीन चार दिवसांत अत्यवस्थ होत असल्याचं दिसून आलंय. अशा रुग्णांना वेळेवर उपचार दिले नाही तर त्यांचा मृत्यू ओढवतो. लॉकडाउन हा जगानं स्वीकारलेला उपाय आहे. प्रत्येकानं हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे,’ असंही ते म्हणाले.
त्यांना सोडणार नाही!
मुदत संपलेली रेमडेसिविर इंजेक्शनही काही लोकांकडून विकली जात आहेत, हे निदर्शनास आणले असता वडेट्टीवार यांनी थेट इशाराच दिला. ‘मुदत संपलेली इंजेक्शन विकणं हा देशद्रोहच आहे. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल. त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही,’ असं वडेट्टीवार म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times