म. टा. प्रतिनिधी, नगरः यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस होईल, पिके चांगली येतील. मात्र, आरोग्याचा प्रश्न भेडसावत राहील. त्यात भर म्हणून आखाती देशात युद्ध पेटेल, आगी लावल्या जातील, त्याचे परिणाम जगाला भोगावे लागतील, आराजकता माजेल, असे भाकित कर्जत येथील संत सद्गुरु यांच्या संवत्सरीमध्ये करण्यात आले आहे.

कर्जत येथील संत सद्गुरु गोदड महाराज यांनी साठ वर्षांची संवत्सरी लिहून ठेवली आहे. यामध्ये आगामी काळातील पिकपाणी, राजकारण, संकटे, नैसर्गिक आपत्ती याबाबत भाकीत करून ठेवले आहे. त्याचे वाचन दरवर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी मंदिरांमध्ये करण्यात येते. अर्थात यावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. कर्जत आणि पंचक्रोशितील भाविक दरवर्षी हे भाकित ऐकण्यासाठी येतात. अनेकदा यातील भाकिते काही प्रमाणात खरी ठरत असल्याने आगाम वर्षाचा अंदाज म्हणून यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांना प्रवेश नाही. गोदड महाराज मंदिराचे विश्वस्त पुजारी पंढरीनाथ महाराज काकडे व अनिल महाराज काकडे यांनी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत या संवत्सरीचे वाचन केले. आगामी वर्षाचे भाकित लिहून ठेवताना गोदड महाराज यांनी म्हटले आहे की, यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस पडणार आहे. पिकेही चांगली येणार आहेत. मात्र आखाती देशांमध्ये यावेळी आगी लागण्याच्या घटना घडणार आहेत. यामुळे अराजकता माजणार असून आखाती राष्ट्रांमध्ये पुन्हा युद्ध भडकून याचा त्रास राजा आणि जनतेला होणार आहे. यावर्षीदेखील आरोग्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा राहणार आहे. याशिवाय पश्चिम विभागामध्ये चक्रीवादळाचा धोका संभवणार आहे. यावर्षीदेखील अवकाळी पाऊस वादळ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

यावर्षी पाऊसमान चांगले सांगितले आहे. खरीप हंगामात हंगामात पिके चांगली येतील. मात्र, काही ठिकाणी जास्त पावसाने नासाडी होण्याची शक्यता आहे. मूग, ऊस, गहू, भात, ही पिके मुबलक येणार आहेत. मृगनक्षत्र सुरू झाल्यानंतर सुरुवातीला कमी पाऊस आहे. परंतु नंतर चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. श्रावण-भाद्रपद महिन्यात चांगला पाऊस होणार असल्याचे म्हटले आहे.

अराजकता माजेलेल्या भाकीत त्यामध्ये असे वर्णन करण्यात आले आहे की, आश्विन आणि कार्तिक महिन्यामध्ये जागतिक पातळीवर अराजकता माजेल. आखाती देशांमध्ये युद्ध होईल. रोगराई वाढेल व राजकारणी आणि जनतेला या काळामध्ये जास्त त्रास होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर वैशाख महिन्यात आखाती देशांमध्ये आग लागून पश्चिम भागात चक्रीवादळामुळे नुकसान संभवते, असेही यात म्हटले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here