नागपूर: ऑक्सिजन अभावी चार करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उघडकीस आली. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेने रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नागपुरमधील जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात एकाच दिवशी चार करोनाबाधित रुग्ण दगावल्याची घटना घडली आहे. या सर्व घटनेमुळे रुग्णालयाबाहेर मोठा गोंधळ उडाला होता.अमित भारद्वाज (वय ३०), हुकुमचंद येरपुडे (वय ५७), कल्पना कडू (वय ३८) आणि किरण गोरके (वय ४७) ,अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्हान तालुक्यातील कांद्री येथील वेकोलिच्या जवाहरलाल नेहरू केंद्रीय चिकित्सालयात नुकतंच कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आलं आहे. सोमवारी रुग्णालयात २९ करोनाबाधितांना दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचारही सुरु होते. मंगळवारी सकाळी रुग्णालयातील सिलेंडरमधील ऑक्सिजन संपले होते. त्याचदरम्यान ऑक्सिजन अभावी चार रुग्णांचा तडफडून मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर रुग्णांच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी कोविड सेंटरमध्ये प्रचंड गोंधळ घातला होता. यामुळं काही काळ तणावही निर्माण झाला होता.

घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला होता. त्यानंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. ऑक्सिजनचा अभाव व रुग्णालयात प्रशिक्षित डॉक्टर व आरोग्य कर्मचारी नसल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या सुचनेवरुन जिल्हा परिषद अध्यक्ष रश्‍मी बर्वे आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी या रूग्णालयात दोन डॉक्टरांची नियुक्ती केली होती. मात्र सोमवारी हे डॉक्टर रुग्णालयात पोहोचलेच नाहीत. मंगळवारी सकाळी हे डॉक्टर रूग्णालयात गेले होते. तेव्हा त्यांना चार रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी तसाच रूग्णालयात काढता पाय घेतला, अशी माहिती आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here