म. टा. विशेष प्रतिनिधी,

मुंबईत पश्चिम, पूर्व उपनगरांतील करोनाचा विळखा अधिकाधिक घट्ट होत चालला आहे. गतवर्षीपासून करोनाने उपनगरांमध्ये ठाण मांडले असून तिथल्या विविध भागांतील रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाहीत. सध्या मुंबईतील सात विभागांमध्ये करोनारुग्णांची संख्या सर्वांत जास्त असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी अंधेरीत सर्वाधिक रुग्ण आढळून येत असून त्यानंतर मालाड, कांदिवली, गोरेगाव, बोरिवली, वांद्रे, घाटकोपरचा समावेश आहे. या सातही विभागांतील तीन दिवसांतील रुग्णसंख्या प्रत्येकी हजार ते दीड हजारापर्यंत पोहोचली आहे.

मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालयांसह वैद्यकीय यंत्रणेवर ताण आला आहे. शहरातील अनेक रुग्णालये, करोना केंद्रांत रुग्णांना प्रवेश मिळणेही अवघड ठरले आहे. संसर्ग आटोक्यात येत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्याचवेळी, गेल्या १५ ते २० दिवसांपासून इथल्या सात विभागांत रुग्णसंख्येतही वाढ होत राहिली आहे. तरीही मुंबईकरांकडून करोना संसर्गासंदर्भात लागू केलेल्या नियमावलीकडे दुर्लक्ष केले जात आहे. बाजारपेठांसह इतर ठिकाणी गर्दीवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.

सर्वांत जास्त करोनारुग्ण आढळलेल्या सात विभागांमध्ये घाटकोपरचा अपवाद वगळता सगळे विभाग पश्चिम उपनगरांतील आहेत. त्यापैकी अंधेरीत ९ ते ११ एप्रिलपर्यंतची रुग्णसंख्या १,८७४ असून दुसऱ्या क्रमांकावरील मालाडमध्ये १,८७३ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत करोनाचा संसर्ग फैलावल्यापासून रुग्ण आढळण्याचे प्रमाण हे पूर्व आणि पश्चिम उपनगरांत सर्वांत जास्त आहे. त्याचा प्रत्यय एप्रिलमधील आकडेवारीतूनही आला आहे.

एकूणच रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या गृहनिर्माण वसाहती मायक्रो कंटेन्मेंट असल्याचे जाहीर करण्यास सुरू केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांमधील पदाधिकाऱ्यांवरदेखील जबाबदारी निश्चित केली आहे.

रुग्णसंख्या (९ ते ११ एप्रिल)

अंधेरी – १,८७४

मालाड – १,८४३

कांदिवली – १,७४७

गोरेगाव – १,६११

बोरिवली – १,५४६

वांद्रे – १,४७२

घाटकोपर – १,१८३

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here