मागील आठवडाअखेरीस लावण्यात आलेल्या दोन दिवसांच्या लॉकडाउनमध्ये एकट्या महाराष्ट्राचे १० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) ही आकडेवारी जाहीर केली आहे.
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लॉकडाउनसदृश्य स्थिती झाली आहे. यामुळे मागील आठवड्यात बाजार कमी-अधिक प्रमाणातच सुरू होता. शनिवार व रविवारी कडक लॉकडाउन व संचारबंदी होती. या सर्वांमध्ये सर्वाधिक रोजगार असलेल्या किरकोळ व्यापार क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे ‘कॅट’चे म्हणणे आहे.
याबाबत ‘कॅट’चे मुंबई महानगर अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले, ‘मागील वर्षीच्या करोना संकटात संपूर्ण व्यापार क्षेत्र जवळपास आठ महिने ठप्प होते. त्यात या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर आता पुन्हा राज्यात आठवडाअखेरीस लॉकडाउन लावल्याचा सर्वाधिक फटका आर्थिक राजधानी मुंबईला बसला आहे. ६० टक्के किरकोळ व्यापारी व त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी भीषण आर्थिक संकटात आहेत. प्रामुख्याने आंतरराज्य व आंतरजिल्हा वाहतुकीत मोठे अडथळे येत आहेत.’
या आकडेवारीनुसार, संपूर्ण देशात सध्या विविध ठिकाणी लॉकडाउनसारखी स्थिती आहे. त्यामुळे घाऊक व्यापार क्षेत्राचे ३२ हजार कोटी, तर घाऊक व्यापार क्षेत्राचे १४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. परंतु सर्वांत मोठे लॉकडाउन महाराष्ट्रात आहे. त्यामुळे येथील किरकोळ क्षेत्राचे सुमारे चार कोटी व घाऊक क्षेत्राचे सहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times