म. टा. प्रतिनिधी, पुणे

करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने प्लाझ्माची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संकलित आणि रुग्णांची संख्या यांचे व्यस्त प्रमाण झाल्यामुळे प्लाझ्मा मिळणे अवघड झाले आहे. प्लाझ्मा दान करण्याची अनेकांची इच्छा आहे. मात्र, त्याचे निकष जाणून घेतल्यास योग्य प्लाझ्मा दाता उपलब्ध होण्यास मदत होईल, असा रक्तपेढ्यांना विश्वास वाटतो.

‘कन्व्हेलसेंट प्लाझ्मा’ म्हणजे काय?

विषाणूंचा प्रादुर्भाव एकाद्या व्यक्तीस झाल्यास त्या व्यक्तीच्या शरीरात या विषाणूविरोधात प्रतीद्रव्ये (अँटीबॉडी) तयार होतात. त्या रक्तातील प्लाझ्मा या घटकात असतात. अशा प्लाझ्माला कन्व्हेलसेंट प्लाझ्मा असे म्हणतात. असा प्लाझ्मा करोनाच्या रुग्णास दिल्यास तो रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते.

ही उपचारपद्धती नवीन आहे का ?

ही उपचारपद्धती नवीन नाही. यापूर्वीही २००२ आणि २०१२ मध्ये आलेल्या साथींमध्ये ही उपचारपद्धती वापरण्यात आली होती; पण त्या वेळी त्या साथी स्थानिक पातळीपुरत्या मर्यादित होत्या. करोना ही मात्र जागतिक स्तरावर पसरलेली साथ असून तुलनेने मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे.

कन्व्हेलसेंट प्लाझ्मा कसा संकलित करतात?

कन्व्हेलसेंट प्लाझ्मा दात्याकडून अफेरेसीस तंत्राद्वारे जमा करतात. यासाठी स्वतंत्र इक्विपमेंट सिस्टीम व त्यासाठी लागणारे किट्स आवश्यक असते. या तंत्राद्वारे प्लाझ्मा दात्याकडून फक्त प्लाझ्मा वेगळा करून संकलित करतात. तसेच बाकीचे सर्व रक्तघटक दात्याकडे परत जातात.

प्लाझ्मा दान कोणास करता येईल?

करोनाच्या आजारातून बरी झालेली व्यक्ती प्लाझ्मा दान २८ दिवसांनंतर प्लाझ्मा दाता म्हणून आपला प्लाझ्मा देऊ शकते; परंतु त्यासाठी काही निकष आहेत. १८ ते ६० वर्षे, गर्भधारणा न झालेली स्त्री, वजन किमान ५० किलो, प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज व प्रोटीन्सचे योग्य प्रमाण बाकीचे सर्व निकष रक्तदानासाठी असणाऱ्या निकषांप्रमाणेच आहेत. प्लाझ्मादान हे संपूर्णपणे निर्धोक असून, त्यासाठी एक तास लागतो.

प्लाझ्मादान कोठे करता येईल?

अन्न आणि औषध प्रशासन मान्यताप्राप्त ज्या रक्तपेढ्यांत हे अफेरेसिस तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्या कोणत्याही रक्तपेढीत प्लाझ्मा दान करता येईल. एकदा प्लाझ्मा दान केल्यानंतर ती व्यक्ती परत १५ दिवसांनंतर पुन्हा प्लाझ्मा दान करू शकते.

कन्व्हेलसेंट प्लाझ्मा कोणत्या रुग्णांसाठी वापरला जातो?

मध्यम स्वरूपाची करोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी कन्व्हेलसेंट प्लाझ्मा उपयोगी आहे. कन्व्हेलसेंट प्लाझ्मामधील अँटीबॉडीज जास्तीत जास्त ४ ते ५ महिने राहतात, असे आढळून आले आहे. सहा महिन्यांपूर्वी ज्यांनी प्लाझ्मा दान केले होतेत्या प्लाझ्मा दात्यांची अँटीबॉडी चाचणी आता निगेटिव्ह येत असल्यामुळे ते प्लाझ्मादाता आता प्लाझ्मादानास पात्र ठरत नाहीत, असेही दिसून येते आहे. दोन ते तीन महिन्यांपूर्वी ज्या व्यक्ती करोनाच्या आजारातून बऱ्या झाल्या आहेत, त्यांच्यात अँटीबॉडीचे प्रमाण योग्य असू शकते. त्या व्यक्ती प्लाझ्मादानास पात्र ठरू शकतात.

रुग्णाचा रक्तगट ……. प्लाझ्मादात्याचा रक्तगट

ए ………………… ए, एबी

बी ……………….. बी, एबी

एबी ……………….. एबी

ओ ………………ओ, ए, बी,एबी

आरएच पॉझिटिव्ह……………… आरएच पॉझिटिव्ह, आरएच निगेटिव्ह

आरएच निगेटिव्ह ……………… आरएच पॉझिटिव्ह, आरएच निगेटिव्ह

रुग्णांची वाढती संख्या आणि तुलनेने पात्र प्लाझ्मादात्यांची कमी संख्या यामुळे कोणत्याच रक्तपेढीत आज कन्व्हेलसेंट प्लाझ्मा लगेच उपलब्ध होत नाही. प्लाझ्मादानासाठी पुढाकार घ्या. करोनाच्या रुग्णांना लवकर बरे होण्यासाठी मदत करा.

– डॉ. आनंद चाफेकर,

विभागप्रमुख, रक्तपेढी, केईएम रुग्णालय

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here