उस्मानपुरा भागात बुधवारी (१४ एप्रिल) सकाळी ११ वाजताच्या सुमारास काही पोलीस कर्मचारी तैनात होते. या भागात एसएस पार्लर नावाचे सलून आहे. ते सुरू असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांनी सलून मालकाला बोलवण्यास सांगितले. फिरोज खान हे घरातून बाहेर आले. ते आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. फिरोज हे जमिनीवर पडलेले होते. तर पोलीस तेथून पळून जात होते, असे त्यांचा नातेवाइक मेराज खान याने ‘मटा’ला प्रतिक्रिया देताना सांगितले. खान यांच्यावर महिनाभरापूर्वीच हृदयाशी संबंधित आजारावर उपचार करण्यात आले होते. खान यांना रुग्णालयात नेण्यासाठी जमिनीवरून उचलले त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झालेली होती, असे नातेवाइकांनी सांगितले. खान यांना औषधोपचारासाठी खासगी रूग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर घाटीत उपचारासाठी हलवण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून खान यांना मृत घोषित केले.
उस्मानपुरा भागातील नागरिकांनी आणि नातेवाइकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला. त्यांनी खान याचा मृतदेह पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवर ठेवला. पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी झाली होती. काही तरुणांनी घोषणाबाजी करून दोषींवर कारवाईची मागणी केली. गर्दी वाढत असल्याने खबरदारी म्हणून अतिरिक्त पोलीस दल आणि शीघ्र कृती दलाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. तणाव वाढत असल्याने घटनास्थळी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचारी होते. खासदार इम्तियाज जलील हे सुद्धा उस्मानपुरामध्ये पोहोचले. त्यांनी मृताच्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली. तसेच पोलीस आयुक्तांसोबत बैठक घेतली. या बैठकीत पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानंतर मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्याची परवानगी दिली. त्यानंतर वातावरण निवळले.
घटनेनंतर विभागाने पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस अंमलदार या दोघांची तडकाफडकी मुख्यालयात बदली केली. पोलीस निरीक्षक दिलीप तारे यांनाही मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अविनाश आघाव यांची नेमणूक करण्यात आली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times