मुंबईः लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण’ योजनेअंतर्गंत पाठवलेली चणाडाळ राज्यातील गोदामात तशीच पडून असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. या आरोपांवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी उत्तर दिलं आहे. तसंच, शिल्लक राहिलेल्या डाळींचे वाटप करण्यास केंद्र सरकारने आजच परवानगी दिली आहे, त्यानुसार शिल्लक डाळीचे लाभार्थींना लवकरच वाटप करण्यात येणार असल्याची, छगन भुजबळ यांनी दिली आहे..

‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न’ योजना – १ व २ आणि आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत एप्रिल, २०२० ते नोव्हेंबर, २०२० या ८ महिन्यांच्या कालावधीमध्ये राज्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थींना प्रतिव्यक्ती ५ किलो अन्नधान्य व प्रतिशिधापत्रिका १ किलो तूरडाळ, चणाडाळ मोफत वाटप करण्यात आली होती. त्यासाठी केंद्रशासनाने राज्यासाठी १, १३, ४२ मे.टन डाळींचे नियतन दिले होते. त्यापैकी १, ६, ६०० मे.टन डाळींचे उपरोक्त ८ महिन्यांमध्ये वाटप करण्यात आल्यानंतर आजपर्यंत राज्य शासनाच्या गोदामांमध्ये व रास्त भाव दुकानांमध्ये एकूण ६,४४२ मे. टन डाळी शिल्लक असल्याची, माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

२६ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या केंद्र शासनासोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उपरोक्त ३ योजनांमध्ये काही प्रमाणात डाळी शिल्लक असून त्यांच्या वितरणाबाबत केंद्रशासनाचे धोरण कळविण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. परंतू, केंद्रशासनाने त्या शिल्लक डाळींचे वाटप करण्याबाबत राज्य शासनास केंद्रशासनाचे धोरण कळविले नसल्याने दिनांक ३ मार्च २०२१ च्या पत्रान्वये केंद्र शासनास प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना १ व आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत शिल्लक असलेल्या डाळींची आकडेवारी कळवून वितरणासाठी परवानगी मागितली होती. त्यानंतर देखील केंद्रशासनाने त्यांचे धोरण राज्य शासनास कळविले नाही. त्यामुळे राज्यशासनाने दिनांक ६ एप्रिल रोजीच्या पत्रान्वये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना १ व २ आणि आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत डाळींचे वाटप केल्यानंतर अंतिमत: शिल्लक राहिलेल्या डाळींची आकडेवारी केंद्रशासनास कळविली असता केंद्रशासनाने आज दिनांक १५ एप्रिल २०२१ रोजी अन्न मंत्रालयाचे उपसंचालक संजय कौशिक यांच्या स्वाक्षरीने पत्रान्वये सदर शिल्लक डाळींचे वाटप राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना करण्याबाबत कळविले असल्याचेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

एकंदरीत तुरडाळ व चणाडाळ यांचे वितरण शक्यतो लवकरात लवकर होणे आवश्यक असते. मात्र, केंद्रशासनाकडून शिल्लक डाळींच्या वितरणासंदर्भात धोरण कळविणे आवश्यक होते. सदर डाळीच्या वितरणासंदर्भातील धोरणात्मक निर्णय केंद्रशासनाकडून आजच प्राप्त झालेला असल्याने त्यातील निर्देशास अनुसरून महाराष्ट्रातील शिल्लक ६, ४४२ मे.टन डाळीचे लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत वितरण करण्यात येत आहे. हे करत असताना कोणत्याही परिस्थितीत खराब किंवा मानवी खाण्यास अखाद्य डाळीचे वितरण होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here