मुंबईः राज्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय आरोग्य संस्थांमधील खाटांची संख्या वाढवा. ऑक्सिजन, रेमडीसीवीरचे व्यवस्थापन तसेच वातावरणातून ऑक्सिजन निर्मितीची यंत्रणा उभारण्यावर भर देतानाच खासगी रुग्णालयातील कोविड सेंटर्सना ते बंधनकारक करा. पॉझीटिव्ह रुग्णांना गृह अलगीकरणा ऐवजी संस्थात्मक अलगीकरणावर भर द्यावा. जिल्ह्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवा, अशा सूचना आरोग्यमंत्री यांनी आज राज्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.

वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य संस्थांमधील कमतरता दूर करा. ऑक्सिजनचे व्यवस्थापन करताना त्याचा अपव्यय आणि अतिरिक्त वापर होणार नाही याकडे लक्ष द्या. वातावरणातील ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाचा सध्या वापर होत असून प्रत्येक जिल्ह्यात असे यंत्र बसविण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या खासगी रुग्णालयांमध्ये कोवीड सेंटर्स सुरू आहे त्यांना ही प्रणाली बसविणे बंधनकारक करण्यात यावे जेणेकरून ऑक्सिजन पुरवठ्याबाबत रुग्णालये सक्षम होतील, असं ठोस सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

कॉण्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याची गरज असून ज्या जिल्ह्यांचे प्रमाण कमी आहे त्यांनी ते वाढवावे त्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मदतीने अन्य विभागातील मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकटवासियांचा शोध घेणे अत्यंत आवश्यक असल्याचंही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी नमूद केलं.

काही जिल्ह्यांचा मृत्यूदर वाढतोय त्याचे कारण शोधा. रुग्ण उपचारासाठी उशीरा दाखल होत असून त्यांनी वेळेवर दाखल व्हावं यासाठी जनजागृती करण्यात यावी जेणेकरून लक्षणं दिसताच रुग्ण वेळेवर रुग्णालयात येतील. त्यासाठी ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांच्या क्षेत्रातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक घ्यावी आणि लक्षणे असलेल्या रुग्णांची तातडीने चाचणी करतानाच अनावश्यक उपचार न करण्याबाबत सूचना देण्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. बऱ्याच ठिकाणी पॉझीटिव्ह रुग्ण होम आयसोलेशन गांभीर्याने पाळत नाही असे निदर्शनास येत आहे त्यामुळे त्यांचे संस्थात्मक अलगीकरण करावे, अशी सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केली.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने कोरोना निदानासाठी आरटीपीसीआर चाचण्यांवर भर द्यावा. ॲण्टीजेन चाचण्यांचे प्रमाण कमी करून दोन्ही चाचण्यां अनुक्रमे ७०:३० या प्रमाणात करण्यात याव्यात. आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट २४ तासात मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश देतांनाच प्रत्येक जिल्ह्यात डॅश बोर्ड आणि हेल्पलाईनची सुविधा झाली पाहिजे. बाधीत रुग्णांची ने-आण करण्यासाठी खासगी वाहने भाड्याने घ्यावीत त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मदत घ्या, असे टोपे यावेळी म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here