चेन्नईसाठी हा आयपीएलमधील पहिला विजय ठरला, यासह चेन्नईच्या संघाने गुणतालिते आपले खाते उघडले. पण चेन्नईने यावेळी पंजाबवर मोठ्या फरकाने विजय साकारला आणि याचाच फायदा त्यांना गुणतालिकेतही झाला. सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचे समान दोन गुण असले तरी चेन्नईच्या संघाने यावेळी मुंबईला गुणतालिकेत मोठा धक्का दिला.
दीपक चहरच्या भेदक गोलंदाजीमुळे पंजाबला चेन्नईपुढे १०७ धावांचे आव्हान ठेवता आले होते आणि त्यांनी हे आव्हान सहा विकेट्स राखत पूर्ण केले. त्यामुळे चेन्नईचा रनरेट चांगलाच वाढलेला पाहायला मिळाला. त्यामुळे या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत थेट दुसरे स्थान पटकावले आहे. पहिल्या स्थानावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ असून त्यांनी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.
पंजाबच्या संघाला या पराभवानंतर मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यावरही पंजाबचा संघ आता सातव्या स्थानावर घसरलेला पाहायला मिळाला आहे. आठव्या स्थानावर सनरायझर्स हैदराबादचा संघ असून त्यांना पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. पण आता उद्या त्यांचा दुसरा सामना मुंबई इंडियन्सबरोबर आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात जर हैदराबादने विजय साकारला तर पंजाबचा संघ तळाला म्हणजेच आठव्या स्थानावर जाऊ शकतो.
सध्याच्या घडीला आयपीएलमध्ये गुणतालिकेत प्रत्येक सामन्यानंतर मोठे बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण कालच्या सामन्यात जर दिल्लीने विजय साकारला असता तर त्यांना अव्वल स्थानावर पोहोचता आले असते. पण त्यांना पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांची थेट चौथ्या स्थानावर घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता उद्याच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ अव्वल स्थानावर पोहोचतो का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times