म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक: नाशिक महापालिके ( ) सध्याच्या परिस्थितीत करोना बाबतचे काम करीत असताना मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन राज्य शासनाने ६३५ कर्मचाऱ्यांच्या भरतीस मान्यता देण्यात आली असल्याचा आदेश मनपास शुक्रवारी ( १६ एप्रिल) रोजी प्राप्त झाला असल्याची माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने विविध पातळ्यांवर करोना बाबत काम करीत असताना मनपास मनुष्यबळ कमी पडत होते. मनपाने शासनाकडे आकृतीबंध सादर केलेला होता. या आकृतिबंधाच्या प्रस्तावातील बाबी विचारात घेऊन महापालिकेच्या व्याप्ती व सर्व विभागांच्या कामकाजाचे स्वरूप लक्षात घेता विविध विभागांना आवश्यक असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची मागणी विचारात घेऊन व आस्थापनेवर विविध संवर्गातील रिक्त झालेली पदे भरून काढण्याच्या दृष्टीने सादर केलेल्या प्रस्तावांचा आढावा घेऊन सरकारने नाशिक महानगरपालिकेच्या गट-अ ते गट-ड मध्ये आवश्यक असलेल्या पदांचा विभागनिहाय आकृतीबंधातील आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, अभियांत्रिकी विभाग, लेखा व परिक्षण विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग या ५ विभागातील ३७ संवर्गातील ६३५ पदांना शासनाने परवानगी दिल्या बाबतचा आदेश उपसचिव यांच्या स्वाक्षरीने पारित झाला असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे. यामुळे मनपाचे विविध कामे करण्यास मनुष्यबळ उपलब्ध होईल, असेही जाधव यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून नाशिक महालिकेतील कर्मचारी निवृत्त होण्याची संख्या मोठ्या प्रमाणात होती. नाशिक शहराची लोकसंख्या विचारात घेता नागरिकांना सोयी देण्यासाठी महापालिकेचे मनुष्यबळ कमी पडत होते. अशातच प्रशासनाने राज्य सरकारकडे मुष्यबळ वाढवण्याची मागणी केली होती परंतु अस्थापना खर्च जास्त असल्याने राज्या सरकारने महापालिकेची मागणी दोनदा फेटाळून लावली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही मागणी पूर्ण करण्यात आली असून ही पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने पदे भरण्यास परवानगी दिली असली तरीही ही प्रक्रीया कधी सुरू होईल या बाबत काही सांगण्यात आलेले नाही.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here